spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मच्छिमारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई :- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी आराखडा तयार करा. तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करून महिना अखेरपर्यंत हे महामंडळ स्थापन करावे अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात आज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील मोठा निधी हा पायाभूत सुविधा उभारणीवर खर्च होत असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावीत आणि त्यासाठीचा संपूर्ण निधी खर्च करावा. तसेच जे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू झालेले नाहीत त्यांचे नियोजन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २ मध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी. निधी १०० टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक लाभार्थी योजनांवर भर द्यावा. बाब निहाय खर्चाचे नियोजन करावे, असेही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, मच्छिमारांसाठी स्थापन करण्यात येत असलेले महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. मच्छिमारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी या महामंडळांच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. त्यामुळे याला प्राधान्य देण्यात यावे. या महिना अखेरीस ही दोन्ही महामंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.