spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलिस दलाचा तिसरा अक्ष…ई-साक्ष

‘ई-साक्ष’ म्हणजे काय?
‘ई-साक्ष’ हे राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाने विकसित केलेले एक डिजिटल मोबाईल अ‍ॅप आणि पोर्टल आहे. याचा उपयोग पोलिस अधिकारी किंवा तपास यंत्रणांकडून गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोळा होणारे व्हिडीओ, फोटो, ऑडीओ, दस्तऐवज आणि इतर डिजिटल पुरावे त्वरित नोंदवून सुरक्षितपणे साठवण्यासाठी होतो. हे अ‍ॅप थेट सेंट्रलाईज्ड सर्व्हरशी जोडलेले असल्याने पुरावे छेडछाडप्रूफ राहतात. म्हणजेच एकदा नोंदवलेला फोटो, व्हिडीओ किंवा दस्तऐवज यामध्ये नंतर फेरफार करता येत नाही. यामुळे तपास प्रक्रियेला विश्वसनीयता प्राप्त होते.

‘ई-साक्ष’चा वापर कशासाठी होणार?
गुन्हा घडलेल्या ठिकाणी घटनास्थळाचा व्हिडीओ, फोटो लगेचच अ‍ॅपवर अपलोड करता येतो. घटनास्थळाची स्थिती बदलली जाण्यापूर्वी त्याचे डिजिटल पुरावे सुरक्षित होतात. मृतदेहाचा फोटो, व्हिडीओ, ओळख पटवणारे तपशील लगेच नोंदवता येतात. यामुळे शवविच्छेदन अहवालाशी पडताळणी सोपी होते. पोलिसांनी जप्त केलेली शस्त्रे, मोबाईल, कागदपत्रे, रोकड यांचे छायाचित्र / व्हिडीओ पुरावे अपलोड करता येतात. महत्त्वाच्या साक्षीदारांचे प्राथमिक जबाब व्हिडीओ स्वरूपात सुरक्षित करता येतात. साक्षीदारांवर दबाव टाकून जबाब बदलवण्याची शक्यता कमी होते.

न्यायालयात छेडछाडप्रूफ डिजिटल पुरावे सादर करता येतात. पुरावे बदलल्याचा आरोप टाळता येतो. तपासातील प्रत्येक टप्प्याची नोंद राहते. कुठे त्रुटी राहिली, कुणी दुर्लक्ष केले हे तपासणे सोपे होते.

‘ई-साक्ष’चे फायदे…
पुरावे छेडछाडप्रूफ राहतात. डिजिटल प्रणालीमुळे एकदा नोंदवलेले पुरावे बदलता येत नाहीत. न्यायालयात पुरावे टिकाव धरतात. तपास प्रक्रियेत पारदर्शकता. गुन्हा घडलेल्या क्षणापासून तपासाची संपूर्ण नोंद डिजिटल स्वरूपात राहते. आरोपी, फिर्यादी किंवा तृतीय पक्षाला शंका घेण्याची संधी कमी होते. न्यायालयीन कामकाजाची गती वाढते. दस्तऐवज, व्हिडीओ, फोटो ऑनलाईन स्वरूपात सादर करता येतात. पुरावे पडताळणीला वेळ कमी लागतो. साक्षीदारांचे संरक्षण. जबाब व्हिडीओ स्वरूपात रेकॉर्ड झाल्याने नंतर दबाव टाकून जबाब बदलवता येत नाही. साक्षीदाराची विश्वासार्हता वाढते. पोलिसांची जबाबदारी निश्चित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानकांशी सुसंगतता
‘ई-साक्ष’ प्रणाली अनेक विकसित देशांतील ‘डिजिटल एव्हिडन्स मॅनेजमेंट’ संकल्पनेशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे भारतातील तपास पद्धती जागतिक दर्जाची होण्यास मदत होईल. गुन्हेगारीवर आळा. पुरावे बदलण्याची शक्यता कमी झाल्यामुळे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल. न्याय मिळण्याची खात्री वाढल्याने समाजात कायद्याबाबत विश्वास दृढ होईल.

न्यायालयीन द़ृष्टिकोन…
न्यायालयीन कामकाजात पुराव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेकदा पुरावा ग्राह्य नाही या कारणावरून गंभीर गुन्ह्यांत आरोपी निर्दोष सुटत होते. ‘ई-साक्ष’मुळे हे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. न्यायालयाला थेट घटनास्थळाचे डिजिटल पुरावे उपलब्ध होणार असल्याने निर्णय अधिक अचूक व न्याय्य होऊ शकतील.

समाजावर परिणाम…
‘ई-साक्ष’ ही केवळ तांत्रिक सुधारणा नाही, तर लोकांच्या मानसिकतेत बदल घडवणारा उपक्रम आहे. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढेल. पीडितांना न्याय मिळेल या विश्वासाला बळ मिळेल. गुन्हेगारांना शिक्षा होण्याची शक्यता वाढल्याने कायद्याबद्दलचा धाक टिकून राहील.

न्यायदान सुलभ!
तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक पद्धतींवरच अवलंबून राहणे हे न्यायव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते. ‘ई-साक्ष’सारखी डिजिटल साधने तपास प्रक्रियेला नवी दिशा देतात. सुरुवातीला पोलिसांनी दुर्लक्ष केले असले तरी आता या अ‍ॅपचा अनिवार्य वापर सुरू झाल्याने पारदर्शक तपास, छेडछाडप्रूफ पुरावे आणि जलद न्याय या त्रिसूत्रीवर आपली न्यायसंस्था उभी राहू शकते.

वापर कुठे होतो? उदाहरणार्थ…
खून प्रकरणात : एखाद्या गावात खून झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचतात. पारंपरिक पद्धतीत फक्त पंचनामा लिहिला जात असे. आता ‘ई-साक्ष’द्वारे मृतदेहाचे व्हिडीओ, रक्ताचे डाग, शस्त्र, बोटांचे ठसे तत्काळ अपलोड होतात. नंतर न्यायालयात आरोपी म्हणाला की, शस्त्र माझ्याकडे नव्हते, तर व्हिडीओ पुरावा निर्णायक ठरतो.

अपघात तपासात : रस्ते अपघातांमध्ये वाहनाची स्थिती, नंबरप्लेट, ब्रेकच्या खुणा, जखमी व्यक्ती यांचे फोटो / व्हिडीओ लगेचच नोंदवले जातात. विमा कंपनी, न्यायालय, पोलिस या तिघांनाही स्पष्ट पुरावा मिळतो. यामुळे दोषारोप लवकर निश्चित होतो.

चोरीच्या गुन्ह्यात : घरफोडीच्या घटनास्थळी पोलिस ‘ई-साक्ष’ने व्हिडीओ घेतात. तुटलेले कुलूप, पळवलेला माल यांचे फोटो लगेच अपलोड होतात. न्यायालयात मालकाच्या जबाबाशी पुरावे जुळवणे सोपे जाते.

गुन्ह्यांच्या तपासात पुरावे हेच सर्वात महत्त्वाचे घटक असतात. न्यायालयीन प्रक्रियेत आरोपीला शिक्षा मिळावी किंवा तो निर्दोष ठरावा यामध्ये पुराव्यांची नितांत महत्त्वाची भूमिका असते. मात्र अनेकदा घटनास्थळाचे छायाचित्र नीट न घेणे, पंचनामा अपूर्ण ठेवणे, पुरावे छेडछाड होणे, साक्षीदारांचा जबाब बदलणे अशा कारणांमुळे गंभीर गुन्ह्यांत आरोपी सुटून जातात किंवा निर्दोषाला शिक्षा मिळण्याची शक्यता निर्माण होते. या त्रुटी कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाने ’ई-साक्ष’ हे मोबाईल अ‍ॅप आणि वेब पोर्टल सुरू केले आहे.

सतीश सरीकर, कोल्हापूर

कायद्याचा धाक वाढेल! ई-साक्ष गुन्हे तपासाच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. घटनास्थळी मिळालेले पुरावे आता कायमचे डिजिटल ठेवा होणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत तेच निर्णायक ठरतात. त्यामुळे तपास जलद, पारदर्शक आणि न्याय झाला तर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल. नागरिकांचा पोलिसांच्या तपासावर विश्वास वाढेल. गुन्हेगारांमध्ये कायद्याबाबत भीती निर्माण होईल.

अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर

source : pudhari


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.