करियर कशातही केले तरी सामाजिक बांधिलकी ठेवा – कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांचे प्रतिपादन

0
47

– राष्ट्रीय / राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन पूर्व निवड चाचणी शिबिरास सुरुवात

नागपूर :- कोणत्याही क्षेत्रात करिअर केले तरी सामाजिक बांधिलकी कायम ठेवा, असे प्रतिपादन कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी केले. युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय पुणे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन पूर्व निवड चाचणी शिबिर महाराज बाग चौक स्थित दीक्षांत सभागृहात शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटनिय कार्यक्रमात कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे मार्गदर्शन करीत होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय पुणे येथील क्षेत्रीय संचालक डॉ. अजय शिंदे, मुंबई विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सुशील शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. राजेंद्र वडजे, मुंबई जिल्हा समन्वयक डॉ. क्रांती इंदूरकर,‌ निरीक्षक डॉ. रमेश देवकर, विद्यापीठाचे राष्ट्रीय संचालक डॉ. सोपानदव पिसे यांची उपस्थिती होती. रासेयो गीत आपणास स्वतःचा समाजाचा राष्ट्राचा विकास करीत जगाची सेवा करण्याचा संदेश देत असल्याचे कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी पुढे बोलताना सांगितले.

आपल्या वागण्यातून आपण व्यक्त होतो. आपणामधील मूळ मूल्यातून आपले व्यक्तिमत्व दिसून येते. इतरांमुळे आपल्या मूळ मूल्यात बदल करू नका. समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना कोणताही संदेश भारतीय संविधानाच्या तत्त्वाशी सुसंगत आहे किंवा नाही याची शहानिशा केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका, असा संदेश कुलगुरूंनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. चुकीची माहिती झपाट्याने पसरत असलेल्या जगात आपण वावरत असताना दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवा. कोणताही निर्णय घेताना आपल्या श्वासावर विश्वास ठेवा. तणाव आल्यास तीव्र श्वास घ्या यामुळे तणाव कमी होईल, असे कुलगुरू म्हणाल्या. पथसंचलन निवड चाचणी शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी उत्कृष्ट आहेत. निवड चाचणी दरम्यान आपणातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन सादर करा, असे आवाहन कुलगुरूंनी यावेळी केले.

रासेयो क्षेत्रिय संचालक डॉ. अजय शिंदे यांनी माहिती देताना महाराष्ट्रातील ४ लाख विद्यार्थ्यांमधून या शिबिराकरिता ३५७ विद्यार्थ्यांची निवड जिल्हा, विद्यापीठ अशी चाळणी होत करण्यात आली असल्याची माहिती दिली. या शिबिरातून ३७ मुले आणि ३७ मुली अशा एकूण ७४ स्वयंसेवकांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या ७४ स्वयंसेवकांना पाठण गुजरात येथे होऊ घातलेल्या पश्चिम क्षत्रिय शिबिरामध्ये सहभागी होता येणार आहे. यातून १२ स्वयंसेवकांची दिल्ली येथील पथसंचलनासाठी निवड केली जाईल. उर्वरित ६२ स्वयंसेवकांना राज्यस्तरीय पथसंचलनात सहभागी होता येणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची सर्वांना संधी मिळेल, असे देखील डॉ. शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला २००९ नंतर यावेळी या शिबिराचे यजमानपद प्राप्त झाल्या असल्याची माहिती दिली. यापूर्वी देखील विद्यापीठाने विविध राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाला विविध जिल्ह्यातून आलेले स्वयंसेवक कार्यक्रमाधिकारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन करीत आभार प्रकाश शुक्ला यांनी मानले.