दिव्यांगत्व तपासणी व निदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

0
51

– दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी मनपाचा विशेष पुढाकार

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या दिव्यांग सर्वेक्षणामध्ये अनेक दिव्यांगांकडे युडीआयडी कार्ड नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्याकरिता मनपाच्या आरोग्य व समाज विकास विभागाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने विशेष दिव्यांगत्व तपासणी व निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत सुरु असलेल्या या शिबिराला शहरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा मोठ्या संख्येत लाभ घ्यावा असे आवाहन मनपाद्वारा करण्यात आले आहे.

दिव्यांग सर्वेक्षणामध्ये युडीआयडी कार्ड पासून वंचित असल्याचे आढळलेल्या अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांकरिता पेइंग वार्ड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसर येथे २२ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आतापर्यंत ३६१ दिव्यांगांची तपासणी करून त्यांचे युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी प्रक्रिया करण्यात आली आहे. मनपाच्या आशा सेविकांनी झोननिहाय केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात एकूण ७० हजार ८८४ पेक्षा अधिक संभाव्य दिव्यांग आहेत. यातील अस्थिव्यंग प्रवर्गात २४ हजार ६३८ संभाव्य दिव्यांग असलेल्याचे निदर्शनास आले असून यापैकी ९४७६ दिव्यांगांकडे युडीआयडी कार्ड आहेत. तर १५ हजार १६२ दिव्यांगांकडे युडीआयडी कार्ड नाही. या सर्व संभाव्य दिव्यांगांची तपासणी करून त्यांना युडीआयडी कार्ड प्रदान करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे टप्प्याटप्प्याने दिव्यांगात्व तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० वर्षाखालील संभाव्य अस्थिव्यंग दिव्यांगांची तपासणी व निदान करून युडीआयडी कार्ड करिता प्रक्रिया करण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील पेइंग वार्डमध्ये हे विशेष शिबिर आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त डॉ. रंजना लाडे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरु असलेल्या शिबिराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या नेतृत्वात डॉ. स्नेहल शंभरकर व त्यांची पूर्ण चमू आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत यांचे सहकार्य लाभत आहे. दिव्यांग बांधव आणि भगिनींच्या सुविधेकरिता शिबिराविषयी मनपाद्वारे एसएमएस पाठविण्यात येत आहेत. याशिवाय अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या नेतृत्वात मनपा आरोग्य विभागाच्या चमूकडून फोन करून सदर संभाव्य दिव्यांगांना फोन करून माहिती दिली जात आहे व त्यांना ठराविक तारखेला उपस्थित राहण्याबाबत सांगितले जात आहे. याशिवाय आवश्यक सर्व सहकार्य देखील चमुद्वारे करण्यात येत आहे.

सर्व विभागांच्या समन्वयातून सुरु असलेल्या या शिबिराला संभाव्य दिव्यांगांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. २२ ते २६ सप्टेंबर २०२५ या ५ दिवसांमध्ये ३६१ दिव्यांगांची तपासणी करून त्यांची युडीआयडी कार्ड करिता नोंदणी करण्यात आली आहे. शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे औषध वैद्यकशास्त्र, अस्थीव्यंगोपचार, बालरोगशास्त्र, भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभाग तज्ज्ञांची चमू दररोज सेवा देत आहेत. ९ ऑक्टोबर पर्यंत शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत सुरु राहणार आहे.