spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शासकीय निधीची बोअरवेल माजी नगरसेवकाच्या घरात?

– डिगडोह जागृती मंचाचा सवाल ; चौकशीसाठी जिल्हाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

डिगडोह (देवी) :- शासकीय निधीचा वापर करुन खोदलेली बोअरवेल माजी नगरसेवक विनोद ठाकरे यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या घराच्या आवारात आढळून आली असून, यावरून गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डिगडोह जागृती मंचने नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

सदर बोअरवेल सार्वजनिक निधीतून करण्यात आली असल्याने तिचा वापर परिसरातील कोणत्याही नागरिकाला करण्याचा हक्क आहे. मात्र, ती बोअरवेल खासगी घराच्या आवारात असल्यामुळे नागरिकांना प्रवेशच मिळत नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

एक तर बोअरवेल जर सार्वजनिक जागेवर असेल तर तिच्यावर ठाकरे कुटुंबाने ताबा कसा मिळवला, आणि जर ती बोअरवेल खाजगी घराच्या जागेवर असेल, तर शासकीय निधीचा वापर वैयक्तिक मालमत्तेसाठी कसा करण्यात आला, असे गंभीर प्रश्न डिगडोह जागृती मंचने या निवेदनात उपस्थित केले आहेत.

यातील सत्य बाहेर येण्यासाठी प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी डिगडोह जागृती मंचने केली आहे. अन्यथा हे सरळसरळ जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे आणि शासकीय निधीचा गैरवापर करणारे कृत्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी आणि डिगडोह (देवी) नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्यांमध्ये डिगडोह जागृती मंचचे मोनू सिंग, जितेंद्र मेश्राम, सतीश कन्हेरकर, बालू व्यवहारे, ज्ञानेश्वर चौधरी, नरेश टेंभरे, रवी चतुर्वेदी, संजू कोल्हे, विक्रम इंगळे, व्यंकटेश पंडलवार, ब्रिजेश मोरया, रवी कनेर, निशांत नचने, देवेंद्र डायरे, कमलेश ढबाले आदींचा समावेश होता.

– फाईल फोटो

Popular Articles