spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोंदिया शहरात वाघाची एन्ट्री; वनविभागाची धडाकेबाज कारवाई-वाघाला जेरबंद करून गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठवले

गोंदिया :- गोंदिया शहरात शनिवारी रात्री अचानक एका वाघाच्या आगमनाने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भागात वाघ ठाण मांडून बसल्याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू मोहीम राबवली. अखेर रात्री तीन वाजेपर्यंतच्या प्रयत्नांनंतर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश आले. या घटनेनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला एक वाघ बसलेला दिसला. नागरिकांनी तात्काळ त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. काही क्षणांतच ही माहिती व्हायरल होताच वन विभागाने फोटोची पडताळणी करून रात्री एक वाजता घटनास्थळी धाव घेतली. वाघाला रेस्क्यू करण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले. वाढती गर्दी आटोक्यात ठेवत अखेर रात्री तीन वाजेच्या सुमारास वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. वाघ अंदाजे चार वर्षांचा असून, काही दिवसांपूर्वी तो सडक अर्जुनी तालुक्यातही दिसल्याचे समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वाघ नदीमार्गे गोंदिया शहरात दाखल झाला असावा. असा अंदाज लावण्यात आला आहे तर वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाघाला पकडून नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात सुरक्षितपणे हलवण्यात आल्यानंतर गोंदिया शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. वन विभागाच्या तत्पर आणि धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Popular Articles