यवतमाळ :- दिवाळी म्हटले की फराळाचे पदार्थ आणि आपल्या आप्तस्वकीयांबरोबर साजरा केलेला आनंद आठवतो. मात्र अनेकजण नोकरी, शिक्षण अथवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात वास्तव्यास आहेत. दिवाळीसारख्या सणाला भारतात येणे त्यांना शक्य नसते. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ टपाल विभागाने एक अभिनव उपक्रम राबवत, दिवाळी फराळ परदेशात पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे
परदेशात पाठवा पारंपरिक फराळ यवतमाळ टपाल विभागाने “फराळाचे पदार्थ माफक दरात परदेशात पाठविण्याची सेवा” सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपला पारंपरिक दिवाळी फराळ सहजपणे आपल्या परदेशातील नातेवाईकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. ही सेवा केवळ टपाल कार्यालयातच नव्हे, तर घरोघरी जाऊनही उपलब्ध आहे. पोस्टमन थेट ग्राहकांच्या घरी येऊन फराळाचे पार्सल स्वीकारतील आणि पुढील कार्यवाही करतील.
अनेक नागरिक शिक्षण व नोकरीसाठी परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यांच्या घरच्यांसाठी हे पार्सल पाठवण्याची ही सुविधा मोठा दिलासा देणारी ठरते आहे. फराळाबरोबरच भेटवस्तू, दिवाळीच्या शुभेच्छा कार्ड्सही या माध्यमातून पाठवता येणार आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध सेवा ही सेवा यवतमाळमधील सर्व उपडाकघरांमध्ये तसेच प्रधान डाकघर, यवतमाळ येथेही उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाकडून करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी मो.क्र. 8788546918 साधवा, के. एल. निनावे, डाकपाल यवतमाळ यांनी केले आहे.




