– दवाखान्यात भरती न होण्याचे आरोग्य विभागाने केले आवहान
नागपूर :- महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी अधिनियम १९४९ चे उल्लंघन करत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर, नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अजनी चौक परिसरातील डॉ.सतीश सोनार यांच्या ‘स्पोर्ट मेड जॉईंट केअर क्लिनिकवर कायदेशीर कारवाई केली आहे. सामान्य नागरिकांना या दवाखान्यात शस्त्रक्रिया किंवा आंतररुग्ण उपचारांसाठी भरती न होण्याची जाहीर सूचना मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या आदेशावर ही कारवाई करण्यात आली आहे. एम.बी.बी.एस. एम.एस. (Ortho) डॉ. सतिश सोनार यांचे अजनी चौक परिसरात दाभाडे अपार्टमेंट येथे ‘स्पोर्ट मेड जॉईंट केअर क्लिनीक’ नावाने दवाखाना चालवितात, या दवाखान्याची महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत नोंदणी झालेली नाही. त्यामुळे कायद्यानुसार, ज्या दवाखान्याची नोंदणी झालेली नाही, त्या दवाखान्यात रुग्णांना भरती करून उपचार करणे कायदेशीररित्या वैध नसते. मात्र, नोंदणी नसतानाही डॉ. सतिश सोनार हे त्यांच्या दवाखान्यात रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार करत असल्याची गंभीर तक्रार मनपाच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी केली आणि डॉ. सतिश सोनार यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
याशिवाय नागरिकांनी डॉ. सतिश सोनार यांच्या ‘स्पोर्ट मेड जॉईंट केअर क्लिनीक’ येथे शस्त्रक्रिया किंवा इतर आंतररुग्ण उपचाराकरीता कोणत्याही परिस्थितीत भरती होऊ नये. असे आवाहन आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.




