चंद्रपूर :- राज्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. विविध ठिकाणी मतदार संपर्क आणि प्रचाराचे नियोजन सुरू असून, या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने इच्छुकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतो आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाने (निवड समितीने) जिल्ह्यातील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. अनेकांनी आपापली दावे मांडत उमेदवारीसाठी अर्ज सादर केले आणि मुलाखती दिल्या.
मात्र कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती की, ही प्रक्रिया फक्त औपचारिकता असून अंतिम उमेदवारी पक्षातील प्रभावशाली नेत्यांच्या निकटवर्तीयांना मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले की, “निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होईल. आम्ही गुणवत्तेच्या आधारे उमेदवार ठरवणार आहोत,” असे त्या म्हणाल्या. तसेच, उमेदवार ठरवण्यासाठी खाजगी एजन्सीद्वारे सर्वेक्षणही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.यासोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करत सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढवणार आहे.








