spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी नगरपरिषद कर्मचाऱ्याला धमकी; वाहनाची चावी हिसकावली

कामठी :- नगरपरिषद कामठीच्या वतीने सार्वजनिक रस्त्यावरील मलबा उचलण्याचे काम सुरू असताना नगरपरिषद कर्मचाऱ्याला अडवून वाहनाची चावी हिसकावणे, शिवीगाळ करून धमकी देणे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना बुधवारी सकाळी हाकी बिल्डिंगच्या मागील बाजूस, लकडगंज परिसरात घडली. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी मोहम्मद मुशीर मोहम्मद मुजीद (वय २८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नगरपरिषद कामठी येथे मुकरदम म्हणून कार्यरत असलेले रामगोपाल ताराचंद गोयल (वय ५४, रा. कादर झेंडा, जुनी खलासी लाईन, कामठी) हे बुधवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजता सार्वजनिक रस्त्यावरील मलबा उचलण्याचे काम करीत होते. नगरपरिषदेच्या कामासाठी ट्रॅक्टरद्वारे मलबा उचलण्याची कार्यवाही सुरू असतानाच आरोपीने ट्रॅक्टर अडविल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर आरोपी गोयल यांच्या अंगावर धावून आला आणि हल्ला करण्याच्या उद्देशाने वर्तन करीत वाहनाची चावी हिसकावून घेतली. तसेच शिवीगाळ व धमकी देत सुरू असलेले काम थांबविले. त्यामुळे सार्वजनिक रस्त्याची स्वच्छता व मलबा हटविण्याच्या नगरपरिषदेच्या कामात प्रत्यक्ष अडथळा निर्माण झाला.

घटनेनंतर गोयल यांनी नवीन कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२६(२), १३२, ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नगरपरिषदेच्या सार्वजनिक कामात अडथळा आणणाऱ्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शासकीय कामकाजाच्या सुरळीत अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोर्डे करीत आहेत.

Popular Articles