spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाजपचे पदाधिकारी काँग्रेसमध्ये

चंद्रपूर :- चिमूरचे भाजप आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत धक्का बसला आहे. त्यांचे कट्टर समर्थक तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री जुनेद खान आणि माजी नगराध्यक्ष संतोष गोहणे यांनी गुरुवारी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांत पक्षप्रवेशांना जोर आला आहे. यात वडेट्टीवार यांनी आघाडी घेत भाजप नेते, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक माजी सभापती प्रशांत समर्थ, एकता समर्थ यांना काँग्रेसमध्ये घेतल्यानंतर चिमूरमध्ये त्यांनी भांगडिया यांना धक्का दिला आहे. जुनेद खान, रोहणे, सतीश वनकर यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूवी आमदार भांगडिया यांनी ब्रह्मपुरीच्या माजी नगराध्यक्ष रिता उराडे, विलास विखार या दोन वडेट्टीवार समर्थकांचा भाजप प्रवेश घडवून आणला होता. आता वडेट्टीवार यांनी भांगडिया यांना मात देण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसला चिमूर नगरपालिका निवडणुकीत खान आणि रोहणे यांचा किती लाभ होतो, हे ३ डिसेंबरला मतमोजणीच्या दिवशीच कळेल.

Popular Articles