spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कधीकाळी होता कचरा, आता दिसतंय आकर्षक रूप

– सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या ठिकाणांचे झाले सौंदर्यीकरण

– शहरातील इतर भागातही या अभियानाला युद्धपातळीवर वेग

नागपूर :-  स्वच्छ, सुंदर व हरित नागपूर साकारताना शहरातील सर्वात जास्त कचरा जमा होणाऱ्या ठिकणांचे नागपूर महानगरपालिकेतर्फे सौंदर्यीकरणाचे कार्य केले जात आहे. आतापर्यंत सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या ठिकाणांचे सौंदर्यीकरण करून आकर्षक रूप देण्यात आले असून, उर्वरित ठिकाणांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी कचरा जमा होणे बंद झाल्याने शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. तसेच कधीकाळी कचरा जमा होणाऱ्या या ठिकाणांना आकर्षक रूप प्राप्त झाले आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शहरातील १० झोनमधील सर्वात जास्त कचरा जमा होणारे विविध ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या या ठिकाणांना कायमस्वरुपी बंद करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले होते. त्यानुसार, या ठिकाणी सर्वाधिक कचरा कां जमा होत आहे, याचे मूळ कारणे शोधून या ठिकाणी पुन्हा कचरा जमा होणार नाही, याची दक्षता स्वच्छता निरीक्षकांनी घेतली. त्यानुसार, मनपाच्या आयईसी चमूद्वारे शहरातील विविध ठिकाणी सौंदर्यीकरणाचे कार्य करण्यात आले.

या ठिकाणी झाले सौंदर्यीकरण

जीव्हीपी स्वच्छतेचे अभियान महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत यशस्वीपणे राबविले जात असून, आयईसी व एनडीएस पथकाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य आहे. या अभियानाअंतर्गत लक्ष्मीनगर झोन मधील उरवेला कॉलनीतील राहुलनगर नाल्याची भिंत, धरमपेठ झोन मधील रामनगर चौक जवळील परिसर, हनुमाननगर झोन मधील विज्ञाननगर नालाजवळ, धंतोली झोन मधील गणेशपेठ भागातील साखरे गुरुजी शाळा व पार्वतीनगर, नेहरूनगर झोन मधील दर्शन कॉलनीतील आवास योजना, गांधीबाग झोन मधील गंजीपेठ अग्निशमन केंद्र, झोन सतरंजीपुरा झोन मधील बारईपुरा मराठी प्राथमिक शाळा, आशीनगर झोन मधील सलीम ग्राऊंड येथील सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या ठिकाणांचे सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील इतर ठिकाणी सुद्धा सौंदर्यीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नागरिकांनी केले कौतुक

पूर्वी ज्या ठिकाणी कचरा जमा होत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. या अभियानामुळे या परिसराचे चित्र बदलून गेले आहे. या बदलामुळे या परिसरातील नागरिकांनी मनपाच्या या अभियानाचे स्वागत केले असून कार्याचे कौतुक केले आहे. या ठिकाणांच्या सौंदर्यीकरणानंतर या ठिकाणांवर पुन्हा कचरा जमा होणार नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर राहणार आहे, तसेच या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयईसीच्या पथकाने संबंधित भागात जाऊन नागरिकांमध्ये स्वच्छते बद्दल जागरुकता निर्माण करणे व या ठिकाणी कचरा टाकण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच नागरिकांनी यासाठी जागरुक नागरिक म्हणून काम करावे व शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Popular Articles