बेला १४ : येथून ४ किमी अंतरावरील पेंडकापार या लहानशा खेड्यातील आशीर्वाद यशोदा गंगाधर वाकडे या युवकाने कौटुंबिक व आर्थिक हलाखीवर मात करीत अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीतून ‘ पब्लिक पॉलिसी ‘ या विषयात पदव्युत्तर (मास्टर्स) पदवी मिळवली. घेतलेल्या गगन भरारीबद्दल त्यांचे बेला व परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अवघ्या ३५० लोकसंख्येच्या पेंडकापार खेड्यात राहणारे गंगाधर वाकडे यांचेकडे केवळ साडेतीन एकर शेती आहे. गावात नसलेल्या माध्यमिक शिक्षणाच्या सोयीमुळे त्यांनी आपल्या मुलाला त्याचे मामाकडे(गजानन पोटे) समुद्रपूर जवळच्या वाघेडा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. त्यानंतर आशीर्वादने हिंगणघाट येथील महात्मा फुले प्रागतिक विद्यालयातून दहावी व जी बी एम एम कनिष्ठ महाविद्यालयातून चांगले गुण घेऊन बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून फिजिक्स मध्ये बीएससी केली. मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून उच्च शिक्षण घेतल्यानंतर विविध सामाजिक स्तरावर काम केले. वर्ष २०१९- २० साली तेलंगणा सरकारच्या आश्रम शाळा विभागात सल्लागार, इसवी सन २०२० मध्ये अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगलोरच्या कोविड डॅशबोर्ड प्रकल्प( हतबल घटक व दुर्गम भागातील सर्वेक्षण व मदत) येथे महाराष्ट्र राज्य प्रोजेक्ट असोसिएट म्हणून काम केले. २०२१ मध्ये I-PAC(निवडणूक व्यवस्थापन कंपनी) येथे राजकीय सल्लागार म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचारार्थ विधानसभा जागांचे व्यवस्थापन व नियोजन केले. नंतर विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली या शासकीय संस्थेची स्पर्धात्मक अशी नेट -जे आर एफ हे फेलोशिप मिळवून बंगलोरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज मध्ये उच्च शिक्षण व ग्रामीण समाज या विषयात डॉक्टरेट पीएचडी साठी प्रवेश घेतला.
आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली
शिक्षण घेत असताना त्यांनी जगातल्या उच्च अशा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे ‘ पब्लिक पॉलिसी ‘ या विषयात पदवीधर ( मास्टर्स) पदवीसाठी प्रवेश मिळवला. हे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद वाकडे यांची महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय शिक्षण शिष्यवृत्ती साठी निवड झाली. त्यासाठी लागणारा पूर्ण खर्च महाराष्ट्र सरकारने दिला. तो त्यांनी शिकागो विद्यापीठातून पीएचडी घेऊन सार्थकी ठरवला.आशीर्वाद सध्या पुढच्या डॉक्टरेट शिक्षणाची तयारी करत असून पुढे महाराष्ट्र शासनाचे विविध प्रकल्प आणि योजना गाव खेड्यातील महिला, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, आणि इतर मागास समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. जिद्दीने घेतलेले शिक्षण व त्याची धडपड नवीन विद्यार्थ्यांसाठी ‘ प्रेरणादायी ‘ आहे.




