नागपूर :- पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्गासाठी (पालखी मार्ग) शासनाने जमिनीचे भूसंपादन केले. परंतु, सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदे गटाशी जवळीक असलेल्यांना त्यांच्या एकाच जमिनीसाठी दोन-तीन वेळा मोबदला देण्यात आला. शासनाच्या निधीची लूट करण्यात आली, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केला.
पंढरपूर ते मोहोळ राष्ट्रीय महामार्ग पालखी क्रमांक ९६५ या रस्त्याचे ५९ किलोमीटरचे काम निघाले. नियमाप्रमाणे केंद्रीय स्तरावर रस्ते निर्माणाबाबत निर्णय झाल्यावर भूसंपादनाची जबाबदारी राज्यातील महसूल खात्याची आहे. केंद्राने निधी दिल्यावर त्याचे वितरणही महसूल खात्याद्वारे होते. या ५९ किलोमीटरच्या महामार्गाचा रस्ता मोहोळ तालुक्यातील पेन्नूर गावातून दीड ते दोन किलोमीटरचा मार्ग जातो. या गावातील काही शेतकऱ्यांची जमीन या रस्त्यासाठी संपादित करण्यात आली. मोबदल्याचा निवाडा झाला. अधिकारी आणि राजकीय पुढाऱ्यांच्या संगनमताने एकाच जमिनीचा दोन ते तीन वेळा मोबदला देण्यात आला. सातबारावर जमिनीची नोंद नाही, परंतु याही व्यक्तीला मोबदला देण्यात आला, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला. या भागातून कुठलीच पाईपलाईन जात नसतानाही ती दाखवून नऊ कोटी ३८ लाख रुपये राज्य शासनाने मंजूर केले आणि पैसे वितरित केल्याचाही आरोप अंधारे यांनी केला.
भाजप, शिंदे सेनेचे पदाधिकारी लाभार्थी
पेनुरमध्ये रकम घेणाऱ्यांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा जिल्हाप्रमुख चरण चौरे आणि भाजपचा जिल्हा सरचिटणीस रमेश माने यांचा समावेश आहे. दोघांसह या गावातील एकूण ७० लोकांनी दुबार-तिबार जमिनीची भरपाई घेतली आहे. हे सर्व एकनाथ शिंदे, जयकुमार गोरे, राजन पाटील यांच्याशी संबंधित असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. हा घोटाळा सचिन ढोले या प्रांत अधिकाऱ्याच्या काळात घडला. पीडित शेतकरी मारुती सुखदेव माने याने मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे बऱ्याचदा पत्रव्यवहार केल्यावरही काहीच झाले नाही. अनेकदा लाभ घेतलेल्यांची संख्या आता ७० असून ११० कोटींची रक्कम उचलली गेली आहे. ५९ किलोमीटरच्या रस्त्यात किती कोटींचे घोटाळे झाले असतील याची कल्पनाही करवत नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, दुसरीकडे राजकीय बगलबच्चांच्या सशक्तीकरणासाठी बिनबोभाट शासकीय निधीचा अपहार केला जात असल्याचाही आरोप अंधारे यांनी केला.








