चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर वाजले आहे. या घोषणेसोबतच शहरातील राजकीय वातावरण, जे इतके दिवस सुस्त होते, ते आता अचानक एखाद्या ‘रिॲलिटी शो’ प्रमाणे जिवंत झाले आहे.
लॅक्मे फॅशन’ की निवडणूक?
गेल्या आठ वर्षांपासून ज्यांनी जनतेला तोंडही दाखवले नाही, असे अनेक ‘इच्छूक’ आता अचानक सक्रिय झाले आहेत. शहरात सध्या एखाद्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. चेहऱ्याला आणि कपड्यांना ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा चकाकणारा मुलामा देऊन, बॅनरबाजीच्या माध्यमातून स्वतःचे ‘दावे’ ठोकण्याची शर्यत सुरू झाली आहे. सोशल मीडियावर स्वतःचा फोटो आणि अंदाजित प्रभाग क्रमांक टाकून, “मीच तो भावी नगरसेवक” असा आव आणणाऱ्यांची गर्दी पाहता, ही निवडणूक आहे की सौंदर्य स्पर्धा, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
अवखे-नवखे आणि प्रस्थापितांची धाकधूक !
पावसाळा सुरू होताच जसे बेडूकांचे आगमन होते, तसे अनेक अवखे-नवखे चेहरे या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत आहेत. राजकीय पक्षांतील उमेदवारांची फौज तर सज्ज आहेच, पण त्यासोबतच हजारो अपक्ष आणि नवीन स्पर्धकांनी शड्डू ठोकल्यामुळे, मुरब्बी आणि जुन्या राजकीय नेत्यांची झोप उडाली आहे. वर्षानुवर्षे राजकारण करणाऱ्यांना या ‘हौशी’ उमेदवारांच्या गर्दीने चांगलाच घाम फोडला आहे.
अंतर्गत कलहाचा भडका?
ही निवडणूक केवळ दोन पक्षांमधील लढाई नसून, पक्षांतर्गत कुरघोडीची मोठी साक्ष ठरणार आहे. उमेदवारीची पावती मिळवण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली असून, राजकीय वर्तुळातील ‘अंतर्गत कलह’ या निवडणुकीत सर्वाधिक गाजणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
सोशल मीडियाचे ‘योद्धे’ जमिनीवर उतरणार का?
सध्या ही लढाई मैदानापेक्षा मोबाईलच्या स्क्रीनवर अधिक लढली जात आहे. मात्र, बॅनरवर चकाकणारे हे चेहरे प्रत्यक्ष मतदारांच्या दारात जाऊन किती धूळ खाणार, आणि सोशल मीडियावरील ही ‘जनजागृती’ प्रत्यक्ष प्रचारात किती तग धरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
चंद्रपूरच्या जनतेला आठ वर्षांनी संधी मिळाली आहे, आता जनता या ‘डिजिटल अवतारांना’ कौल देते की कामाच्या माणसाला, हे निकालाच सांगेल!








