spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

न्या. नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली

नागपूर, दि. १५  : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या मुख्य न्यायमूर्तींशी सल्लामसल्लत करून सदर निर्णय जारी केला आहे.

यासंदर्भात भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, न्या. नितीन सांबरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कार्यभार स्वीकारावा, असे निर्देशित करण्यात आले आहे.

न्या. सांबरे यांनी १९८९ साली वकील म्हणून कायद्याच्या व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या तिन्ही खंडपीठांमध्ये सक्रियपणे काम केले. २०१४ साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी नागपूर खंडपीठात नियुक्तीवर असताना अनेक महत्त्वाचे प्रकरण हाताळले.

त्यांच्या न्यायदानातील स्पष्ट विचारसरणी, कायद्याचे सखोल ज्ञान आणि सामाजिक भान यामुळे त्यांचे निर्णय नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी गुन्हेगारी, नागरी, प्रशासकीय तसेच घटनात्मक बाबींवरील विविध प्रकरणांमध्ये निर्णायक आणि मार्गदर्शक निर्णय दिले आहेत.

त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी कठोर निरीक्षण व पारदर्शकतेचा आग्रह धरला. पर्यावरणीय हानी संदर्भातील प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या अधिकारांचा प्रभावी वापर करीत प्रशासनाला जबादारीची जाणीव करून दिली. महिलांच्या सक्षमीकरण व लैंगिक अत्याचारविरोधी खटल्यांमध्ये तातडीने सुनावणी व स्पष्ट भूमिका त्यांची राहिली आहे.

न्या. नितीन सांबरे यांच्या दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या बदलीमुळे न्यायालयीन प्रणालीस एक अनुभवसंपन्न आणि निपुण न्यायमूर्ती लाभणार आहेत. विधिजगतातून तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या नव्या नियुक्तीसाठी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.