spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उमेदवारांसाठी आदर्श आचारसंहितेमध्ये विविध तरतुदी व सूचना

नागपूर :- राज्य निवडणूक आयोगाद्वारे नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यानुसार निवडणूक काळात उमेदवारांनी काय करावे व काय करण्यावर निर्बंध आहेत. याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदारांना मतासाठी पैशाचे प्रलोभन दाखविणे किंवा दारुचे वाटप करणे, ही कृती निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन ठरणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीसाठी आदर्श निवडणूक आचारसंहिता जारी केली आहे. याअंतर्गत उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी काय करावे व काय करू नये, यासंदर्भात सविस्तर सूचनाही जारी केल्या आहेत.

काय करु नये

निवडणूक काळात उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करता येणार नाही. सत्तारुढ पक्ष/शासनाने साध्य केलेल्या उद्दीष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देता येणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषण करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते इ. बांधण्याचे वचन देता येणार नाही.

स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य सरकारला शासन/सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ (Ad hoc) नियुक्त्या करता येणार नाही.

मंत्री (राज्यमंत्री व उपमंत्रीसहित) हे उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येणार नाही.

निवडणूक मोहिम/प्रचार करताना कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये. मतदाराच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करता येणार नाही. इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये.

निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादी साठी कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर करता येणार नाही. दुसऱ्या पक्षांनी किंवा उमेदवारांनी लावलेली प्रचारपत्रके, भित्तीपत्रके काढून टाकण्यात येऊ नयेत. मात्र याबाबत काही आक्षेप असल्यास पोलिसांच्या किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणावे.

ध्वनिक्षेपकांचा सकाळी ६ वाजण्यापूर्वी किंवा रात्री १० वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याखेरीज वापर करु नये. तसेच याबाबत असलेले The Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षाजवळ प्रचारपत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करता येणार नाही.

काय करता येईल

महानगरपालिकेत चालू असलेले कार्यक्रम / योजना पुढे सुरु ठेवता येतील. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व या संदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत.

जाहीर सभेसाठी ध्वनिक्षेपक (Loudspeaker) किंवा कोणत्याही इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी योग्य परवानगी मिळविली पाहिजे. कोणत्याही मिरवणुकीची प्रारंभीची वेळ व जागा, मिरवणूक ज्या मार्गाने जाईल तो मार्ग व मिरवणुकीची अखेर होईल अशी वेळ व स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी व पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मिरवणुकीमुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये.

ओळख चिठ्ठ्या पांढऱ्या कागदावर द्याव्या

मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर देण्यात येतील व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव यांचा निर्देश असणार नाही, याची काळजी उमेदवारांनी तसेच राजकीय पक्षांनी घेण्याची आवश्यकता आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.