– ११ ऑक्टोबरला घटस्थापना; २५ ऑक्टोबरला कन्यापूजन, महाप्रसाद, शोभायात्रा व विसर्जनाचे आयोजन
संदीप कांबळे,कामठी :- घोरपड रोड येथील श्री दुर्गादेवी मढी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मंदिराचे विश्वस्त शिवरामप्रसाद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, विविध धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.
रविवार, ११ ऑक्टोबर रोजी श्री नवदुर्गादेवी घटस्थापना, पूजाअर्चा व हवनाने उत्सवाचा शुभारंभ होईल. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी अष्टमी पूजाविधी व हवन, तर सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी नवमी पूजाविधी व हवन करण्यात येणार आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कन्यापूजन, पूर्णाहुती, महाप्रसाद, शोभायात्रा आणि विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात येईल. यंदा भाविकांसाठी विशेष आकर्षण म्हणून मनोकामना अखंड ज्योत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील स्वतंत्र अखंड ज्योत कक्षात रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येणार असून, मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता तिचे विसर्जन करण्यात येईल.
भाविकांना स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या नावाने ८५१ रुपये अर्पण करून मनोकामना अखंड ज्योतीची नोंदणी करता येणार आहे. या धार्मिक उपक्रमात सहभागी होऊन देवीच्या चरणी मनोकामना व्यक्त करण्याची संधी भाविकांना उपलब्ध होणार आहे.
मनोकामना अखंड ज्योत नोंदणी आणि उत्सवाविषयी अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा.
– ईश्वरचंद्र चौधरी : ९३७३३२२४४४
– सदन यादव : ८४५९०८२६६६
– पंडित शंकर द्विवेदी : ७८७५९१००४५
या नवरात्रोत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.








