– तांत्रिक तपासातून विधिसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग उघड; ६६ हजारांचे तीन मोबाईल जप्त
संदीप कांबळे, कामठी :- घराबाहेरील खिडकीत विद्युतभारित करण्यासाठी ठेवलेले तीन मोबाईल चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा नवीन कामठी पोलिसांनी यशस्वी तपास करत छडा लावला. गुप्त माहितीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून सुमारे ६६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त केले. या कारवाईमुळे मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जितेंद्र सिंग रवींद्र सिंग (वय ३६) हे व्यवसायाने अभियंता असून, रेल्वे स्थानक परिसरातील कामानिमित्त कामठी येथे भाड्याच्या घरात आपल्या कामगार सहकाऱ्यांसह वास्तव्यास होते. ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास कामावरून घरी परतल्यानंतर त्यांनी स्वतःचा आणि सहकाऱ्यांचे असे तीन मोबाईल घराबाहेरील खिडकीत विद्युतभारित करण्यासाठी ठेवले. त्यानंतर ते झोपले.
सकाळी सात वाजताच्या सुमारास उठून पाहिले असता खिडकीत ठेवलेले तिन्ही मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरून नेल्याची तक्रार त्यांनी नवीन कामठी पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकाने गुप्त माहितीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित केली. तसेच तांत्रिक तपासाचा आधार घेत चोरीच्या मोबाईलचा माग काढला. या तपासातून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे अल्पावधीतच मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात आयफोन १३ (किंमत अंदाजे ५० हजार रुपये), रेडमी १० (किंमत अंदाजे १० हजार रुपये) आणि विवो कंपनीचा मोबाईल (किंमत अंदाजे सहा हजार रुपये) यांचा समावेश आहे. या तिन्ही मोबाईलची एकूण अंदाजित किंमत ६६ हजार रुपये आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त अंकुश खेडकर आणि नवीन कामठीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अक्षय झगडे, पोलिस हवालदार दीपक चोले, पोलिस अंमलदार नसीम अन्सारी, आकाश टेकाम आणि विलास चिंचोलकर यांच्या पथकाने केली.








