सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- पूर्वीच्या काळात भल्या पहाटे मधुर आवाजात ‘वासुदेव आला हो वासुदेव आला पहाटेच्या पारी हरिनाम बोला’ असे म्हणत लोकगीतातून हरिनामाचा गजर करीत वासुदेव घरधनीच्या पित्तरांचे गोडवे गात प्रभुनामाची लोकगीते व त्यातून घरधनीसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी परमेश्वराचे आशीर्वाद मागत असे. हा आमचा खरा सांता. रात्री अपरात्री न येता पहाटे मंगल समयी येऊन समाज प्रबोधन करणारा, आशीर्वाद देऊन जाणारा. जुन्या काळात मराठी मुलखातील खेडोपाडी येणारी पहाट मोठी देखणी असायची. घराघरातून जात्यावरची गाणी म्हणत धान्य दळणार्या महिला, गल्लीगल्लीत खांद्यावर कावड घेऊन आडावरून पाणी आणणारी गडीमाणसं अन् त्याच वेळी डोक्यावर मोरपिसांची उभट टोपी घातलेला, अंगात विशिष्ट प्रकारचा झगा, खाली विजार किंवा धोतर, कमरेला बांधलेलं उपरणं, कपाळावर आणि गळ्यावर गंधाचे टिळे, गळ्यात तुळशीच्या माळा, काखेला झोळी, पायात घुंगरू, हातात चिपळ्या, टाळ आणि मुखात भगवंताचे नाम म्हणत नाच करणारा वासुदेव दिसायचा. अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. त्याचे दर्शन घडले की लहान मुले आनंदून जात. बायका माणसे सुपातून जोंधळे घालत आणि दान करत. पुरुष माणसे दुंडा पैसा देऊन त्याला नमस्कार करत. वासुदेवही दान पावलं म्हणत अंगणात नाच करी. सारे अंगण जसे काही समाधानाने आनंदून जाई. संपूर्ण कुळाचा उद्धार व्हावा व दानातून पुण्यकार्य केल्याचे समाधान लाभावे, यासाठी वासुदेवाला पूर्वी घरोघरी धान्य व दक्षिणा मोठ्या प्रमाणात भेट स्वरूपात दिली जात असे. मात्र आधुनिक काळात ही संस्कृती लोप पावत चालली आहे. ग्रामीण भागात मात्र परजिल्ह्यातून येणाऱ्या व वंशपरंपरागत हा भिक्षुकीच्या व्यवसाय करणाऱ्या वासुदेवाचे दर्शन आजही अधूनमधून होत असते.








