– एसटीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक:- आगारातील एसटीच्या मर्यादित संख्येमुळे ग्रामीण भागात फेऱ्या कमी असल्याने रामटेकमध्ये येणार्या शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे एसटीच्या अनियमित वेळेमुळे हाल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेषत: बाहेर गावातून येणार्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. सकाळचे कॉलेज असते. परंतु, सकाळी एसटी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये पोहोचण्यास उशीर होत आहे. आणि त्यांच्या शैक्षणिक सत्रावर नुकसान होत आहे. या सर्व समस्या जाणून घेतल्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रामटेक यांच्यावतीने विद्यार्थ्यांना योग्य व्यवस्था व्हावी याकरिता रामटेक एसटी आगार येथे आंदोलन करण्यात आले. रामटेक-भंडारा मार्गावरील अनेक एसटी बस नांदगाव फाटा, तसेच खराडा मार्गावरील शिवाडौली मांद्री व पंचाळा येथे थांबत नसल्याने आणि वेळेवरही येत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रोज बस दोन ते तीन तास उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांचे कॉलेज परीक्षा व दैनिक दिन वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सकाळी कॉलेजला जाण्यासाठी व संध्याकाळी घरी परत येण्यासाठी आवश्यक असलेल्या बससेवा अपुऱ्या असून अधिकृत थांबा असतानाही बस न थांबविणे हा विद्यार्थी आणि प्रवाशाच्या सुरक्षितेच्या गंभीर प्रश्न आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे विभाग छात्र प्रमुख निलिमा पारधी, नगरमंत्री आर्यन झाडे, सहनगरमंत्री प्रियांशु भगवान बावनकुळे, सहमंत्री पियुश वैद्य, जिल्हा आयाम प्रमुख युगेश विष्णु देशमुख, रामटेक नगरमंत्री अंशुल कांबळे, रामटेक कार्यालय मंत्री साक्षी कडू, जिल्हा संयोजक रितिक आकरे, विद्यार्थी विस्तारक पवन वानखेडे, यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व अधिकृत थांब्यांवर बस थांबवाव्यात, वेळापत्रकानुसार नियमित बससेवा सुरू करावी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त बस उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.








