Home Latest News ग्रामपंचायत नगरधनला आंतरराष्ट्रीय मानांकन

ग्रामपंचायत नगरधनला आंतरराष्ट्रीय मानांकन

0
51

– मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे औचित्य

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत नगरधन ने गुणवत्तापूर्ण प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आयएसओ 9001:2015 हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे. हे प्रमाणपत्र ग्लोबल सर्टिफिकेशन या मान्यताप्राप्त प्रमाणन संस्थेमार्फत प्रदान करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध, पारदर्शक व नागरिकाभिमुख कार्यपद्धतीची सखोल तपासणी व मूल्यांकन करून हे मानांकन देण्यात आले आहे.

सामान्य प्रशासन, आरोग्य सेवा, शिक्षण व प्रशिक्षण, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, बांधकाम (वर्क्स), लघु सिंचन, वित्त व लेखा, सामाजिक कल्याण, कृषी तसेच महिला व बालकल्याण या विविध सेवा क्षेत्रांतील गुणवत्तापूर्ण कामकाजासाठी ग्रामपंचायत नगरधनची निवड करण्यात आली आहे. ISO 9001:2015 प्रमाणपत्रामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात शिस्त, पारदर्शकता, वेळेवर सेवा, तक्रार निवारण व नागरिक समाधान यांना अधिक बळ मिळणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबवून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. हे यश सरपंच माया दमाहे, उपसरपंच श्रीराम धोपटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे, जितेंद्र सरोदे, विलास कुंभले, मोहित इखार, वासुदेव चवरे, माधुरी बोरकर, सुरेखा नागरिकर, शारदा सरोदे, संगीता तरारे, शारदा ठाकरे, रोशनी सरोदे, संगीता नान्हे, तसेच ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा बानाबाकोडे व सर्व कर्मचारी यांच्या संघटित प्रयत्नांचे फलित आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायत नगरधन भविष्यातही गुणवत्ता, पारदर्शकता व विकासाभिमुख प्रशासनाची परंपरा कायम ठेवणार असल्याचा विश्वास ग्रामपंचायत कमेटीने व्यक्त केला आहे.