– संयुक्त पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई; सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने प्रशासनाचा दणका
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा शहरातील सार्वजनिक रस्ते आणि नाल्यांवर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी आज, २ जानेवारी २०२६ रोजी नगरपरिषद प्रशासनाने मोठी मोहीम राबवली. खांब तलाव चौक ते खात रोड या मार्गावरील तब्बल ४० पानठेले, बांबूची कच्ची दुकाने आणि टिनाचे शेड उद्ध्वस्त करून रस्ता मोकळा करण्यात आला. नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील सार्वजनिक रस्ते, नाल्या आणि मोकळ्या जागांवर अनेकांनी ओटा, पायऱ्या, टिनाचे शेड आणि कच्च्या-पक्क्या स्वरूपाचे अवैध बांधकाम करून अतिक्रमण केले होते. या संदर्भात नगरपरिषदेने २९ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण शहरात लाऊडस्पीकरद्वारे (मुनादी) जाहीर सूचना दिली होती. हे अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्याने अखेर आज प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.

आज सकाळी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे पथक पोलीस फौजफाट्यासह रस्त्यावर उतरले. खांब तलाव चौक ते खात रोड या वर्दळीच्या मार्गावर ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेले ४० पानठेले, बांबूची तात्पुरती दुकाने आणि छतासाठी टाकलेले टिनाचे शेड हटवण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.
या मोहिमेत मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्यासह पवन कनोजे, संकेत कोचे, मिथुन मेश्राम, सनी सोनेकर, पवन मोगरे, अंकुश हुमणे, आकाश मेश्राम, सागर रगडे, अरविंद गणवीर आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होती आणि नाल्या उपसण्यास अडथळे येत होते. आजच्या या कारवाईमुळे हा परिसर मोकळा झाला असून, नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. आगामी काळात शहरातील इतर भागांतही अशाच प्रकारे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याचे संकेत नगरपरिषद प्रशासनाने दिले आहेत.








