– जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रशासनाचा उपक्रम
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जानेवारी २०२६ रोजी लाखनी येथे नागरिकांसाठी शासकीय सेवा व योजनाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा भंडारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्यास नागरिकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश अस्मर यांनी केले आहे.
जिल्हा न्यायलय येथे आयोजित महामेळावासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लिना ढेंगे-फलके व प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश मिलिंदकुमार बुराडे व इतर न्यायाधीश तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या अध्यक्षतेखाली हा महामेळावा होणार असून महामेळाव्याचे उद्घाटन ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. महामेळावा सकाळी १०.३० ते दुपारी ४ या कालावधीत होणार आहे.
महामेळाव्यात शासनाचे विविध विभाग व कार्यालये सहभागी होतील. ते जनतेस विविध शासकीय योजनांचा माहिती देतानाच या योजनांचा लाभही देतील. या महामेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय, आदिवासी विकास विभाग, कामगार विभाग, महसूल, समाजकल्याण, भूमी अभिलेख, वीज वितरण कंपनी, आरोग्य, शिक्षण, जिल्हा माहिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, मोफत विधी सहाय्यसल्ला, सायबर क्राइम, व शासनाचे इतर सहभागी होणार आहेत.








