spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाज्योतीतर्फे नोंदणी दिनांकापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी! 

 
आमदार अभिजित वंजारी यांचा सवाल
मंजूर आणि खर्च होणाऱ्या निधीबाबतही उचलला मुद्दा
 
मुंबई/नागपूर १६ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अभिजित वंजारी यांनी महाज्योती अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भात आणि संस्थेला मिळणाऱ्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केला.
 
प्रश्नोत्तराच्या तासात आमदार वंजारी म्हणाले, महाज्योतीच्या योजनांद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याच्या दिनांकापासून पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहात काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 
 
यावेळी त्यांनी सन 2023–24 मध्ये महाज्योतीला मंजूर आणि खर्च झालेल्या निधीबाबतही माहिती दिली. वंजारी म्हणाले, सन 2023–24 या वर्षात केवळ ₹55 कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ₹323 कोटी रुपये खर्च झाले आहेत. म्हणजेच मंजूर निधीच्या तुलनेत तिप्पट खर्च झालेला आहे. विद्यार्थी संख्या ठरलेली आहे आणि खर्च किती होणार हे माहिती असताना तेवढ्या निधीची तरतूद का केली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 
त्यामुळे महाज्योतीच्या निधी नियोजनात स्पष्टता आणि शिस्त असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे योजनांचा लाभ योग्य रीतीने आणि वेळेवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल, असे वंजारी म्हणाले.
 
सरकारकडून उत्तर देताना संबंधित मंत्री महोदयांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, महाज्योतीच्या निधीविषयी आणि खर्चाच्या तफावतीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.

Popular Articles