– माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नागपूर :- शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आई-वडिलांनी आपल्याच १२ वर्षीय मुलाला साखळी आणि कुलूप लावून घरात कैद करून ठेवल्याचे उघड झाले आहे. हा अमानवीय प्रकार गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू होता.
नागपूर शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आई-वडिलांनी आपल्याच १२ वर्षीय मुलाला साखळी आणि कुलूप लावून घरात कैद करून ठेवल्याचे उघड झाले आहे. हा अमानवीय प्रकार गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू होता.
पालकांचा दावा
पालकांचा दावा आहे की, मुलगा वारंवार चुकीचे वर्तन करतो. त्यामुळे ते दोघेही मजुरीसाठी बाहेर पडताना घर रिकामे राहू नये म्हणून मुलाला साखळीने बांधून ठेवत असत. संध्याकाळी घरी परतल्यानंतरच त्याला मोकळे सोडले जाई. या क्रूर कृत्यामुळे मुलाच्या हात-पायांना गंभीर आणि खोल जखमा झाल्या आहेत.
१०९८ वर याबाबत तक्रार प्राप्त
चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर याबाबत तक्रार प्राप्त होताच बाल संरक्षण पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. मुलाची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि नंतर त्याला सुरक्षित बालगृहात हलवण्यात आले. मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी त्याचे समुपदेशनही सुरू करण्यात आले आहे.
मुलाच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात मुलाच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या तरतुदींनुसार त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे.
जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दोषी पालकांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बचाव कारवाई यशस्वी
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्यासह पथकातील इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून ही बचाव कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.








