हंसराज प्रतिनिधी,भंडारा :- डोंगरी गाईन्स प्रतिबंधित क्षेत्रातून अवैध मॅग्नीजची चोरी करून त्याची घरात साठवणूक करणाऱ्या टोळीवर गोबरवाही पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.३० ते २.१० वाजताच्या सुमारास मौजा कुरमुडा येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी राजकुमार हरीचंद मोहनकर (३४, रा. कुरमुडा) हा आरोपी जावेद खान (३५, रा. चिखला) व पिंटू बहरवाल (४०, रा. तुमसर) यांच्या मदतीने प्रतिबंधित क्षेत्रातील मॅग्नीजची (काळा दगड) चोरी करून घरी साठवणूक करत असताना मिळून आला.
पोलिसांनी या छाप्यात ३० हजार रुपये किमतीचे २००० किलो मॅग्नीज, ३० हजार रुपयांची बजाज डिस्कव्हर मोटार सायकल (क्र. MH-40 A-0525) आणि १ हजार रुपयांचा वजन काटा असा एकूण ६१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपींविरुद्ध गोबरवाही पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ०७/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२), ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय रोडे करीत आहेत.




