-“वाघाये महाविद्यालय लाखनी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी”
हंसराज प्रतिनिधी, भंडारा लाखनी :- शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून समाजातील रूढी-परंपरांविरुद्ध लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लाखनी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने आयोजित हा सोहळा प्रभारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव:
याप्रसंगी मुख्य वक्ते म्हणून डॉ. चंद्रशेखर देवघरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, समाजाचा रोष पत्करून मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. विधवा पुनर्विवाहास पाठिंबा आणि अस्पृश्यतेविरोधात त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल समाजहिताचे होते. केवळ जयंती साजरी करणे पुरेसे नसून, त्यांचे विचार आचरणात आणून ते कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनुराधा खाडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका प्रा. मनीषा सपाटे उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणातून डॉ. खाडे यांनी सावित्रीबाईंच्या स्त्री-शिक्षणातील योगदानावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शाचे पालन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांनी अत्यंत खुबीने केले, तर उपस्थितांचे आभार रासेयो सहप्रमुख डॉ. मंगेश वंजारी यांनी मानले. या सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरात सावित्रीबाईंच्या जयघोषाने उत्साह दिसून आला.








