– परवडणाऱ्या प्रिमियममध्ये व्यापक अपघात विमा संरक्षण
नवी मुंबई :- सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या संकल्पनेनुसार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मार्फत ‘ग्रुप अॅक्सिडेंट गार्ड (GAG) पॉलिसी’ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही माहिती डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल यांच्या वतीने देण्यात आली आहे.
या पॉलिसीअंतर्गत अपघातामुळे होणारा मृत्यू, अपघाती रुग्णालयात दाखल होणे तसेच कायमस्वरूपी पूर्ण किंवा अंशतः अपंगत्व अशा परिस्थितींमध्ये विमाधारकास आर्थिक संरक्षण प्रदान करण्यात येते. ही विमा योजना अत्यंत परवडणाऱ्या प्रिमियममध्ये, नागरिककेंद्रित आणि सुलभ स्वरूपात उपलब्ध असून कामगार, शेतकरी, स्वयंरोजगार करणारे नागरिक तसेच ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.
‘ग्रुप अॅक्सिडेंट गार्ड पॉलिसी’चे प्रमुख लाभ म्हणून अपघाती मृत्यूच्या प्रसंगी विमा संरक्षण, अपघातामुळे रुग्णालयात दाखल झाल्यास आर्थिक मदत, कायमस्वरूपी पूर्ण किंवा अंशतः अपंगत्वासाठी भरपाई, तसेच मृत विमाधारकाच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती सुविधा देण्यात येते. यासोबतच या योजनेत सुलभ नोंदणी प्रक्रिया आणि सोपी व त्रासमुक्त दावा प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पॉलिसीसाठी वार्षिक प्रिमियम आणि विमा रकमेचे (Sum Assured) पर्याय देण्यात आले असून रु. ३२८ वार्षिक प्रिमियममध्ये रु. ५ लाखांचे विमा संरक्षण, रु. ५४८ वार्षिक प्रिमियममध्ये रु. १० लाखांचे विमा संरक्षण, तर रु. ७४९ वार्षिक प्रिमियममध्ये रु. १५ लाखांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. (सर्व लाभ व अटी पॉलिसीच्या नियम व अटींनुसार लागू राहतील.)
आयपीपीबी बचत खातेधारक नागरिक आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस, पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून या पॉलिसीचा लाभ सहजपणे घेऊ शकतात. इंडिया पोस्टचे व्यापक जाळे विमा व आर्थिक सेवा नागरिकांपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची ‘ग्रुप अॅक्सिडेंट गार्ड पॉलिसी’ ही सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि नागरिककेंद्रित सेवा वितरणाला चालना देणारी महत्त्वपूर्ण योजना असून, इंडिया पोस्ट व आयपीपीबी राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुरक्षित, परवडणाऱ्या आणि तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. य योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाशी नवीमुंबई विभागाच्या पोस्ट ऑफीसचे अधिक्षक यांनी केले आहे.




