spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वरठी परिसरात रेती तस्करांवर महसूल व पोलिसांची मोठी कारवाई; १७ ट्रकसह ६ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज, प्रतिनिधी भंडारा वरठी :- भंडारा जिल्ह्यातील रेती तस्करांविरुद्ध प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव देवी परिसरात करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत १७ रेतीचे ट्रक पकडण्यात आले असून, एकूण ६ कोटी २८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी (भंडारा), महसूल कर्मचारी, पोलीस स्टेशन वरठी, पोलीस स्टेशन मोहाडी आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग (RTO) भंडारा यांच्या संयुक्त पथकाने मोहगाव देवी येथील जयकिसन राईस इंडस्ट्रीजवळ सापळा रचला होता. यावेळी अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून विनापरवाना वाहतूक करणारे १७ टिप्पर ट्रक पथकाच्या जाळ्यात अडकले.

१७ आरोपींवर गुन्हे दाखल

या प्रकरणी वस्ती (ता. मोहाडी) येथील मंडल अधिकारी महादेव ज्ञानोबा इप्पर (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मीकांत बेंदरे, मंगेश नेहरकर (दोन्ही रा. बेटाळा), विक्की मडामे (सुरेवाडा), धीरज मेश्राम (इंजेवाडा), जागेश्वर मेश्राम (दहेगाव), सम्यक नारनवरे (दाभा), अनिल ढेंगे (टाकळी), चंद्रशेखर शेंद्रे (पालगाव), मिलिंद सुखदेवे (पलाडी), आकांत बनपूरकर (भोजापूर), प्रशांत मारबते (खैरी), सूर्यभान सेलोकर (बोरगाव खुर्द), प्रवीण पुरी (देव्हाडा बु.), सागर चीनकुरे (जमनी), श्याम बाबरे (बोथली), संदीप सार्वे (बोरगाव खुर्द) व अन्य एकाचा समावेश आहे.

कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या १७ ट्रकमध्ये एकूण १३७ ब्रास रेती मिळून आली, ज्याची किंमत ८ लाख २२ हजार रुपये आहे. तसेच, जप्त केलेल्या १७ टिप्पर ट्रकची अंदाजे किंमत ६ कोटी २० लाख रुपये आहे. असा एकूण ६ कोटी २८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाने हस्तगत केला आहे.

या प्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी निलेश गिरी हे करीत आहेत.

अवैध रेती उत्खननाविरुद्ध प्रशासनाने उगारलेल्या या कठोर शस्त्राने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, भविष्यातही अशा कारवाया सुरूच राहतील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Popular Articles