महाकाव्यांत, इतिहासातही नगरे आहेत, हुकूमशाहीतही नगरे हवीच; आपली तर लोकशाही… आपल्या शहरांत पुन्हा प्राण फुंकण्याचा विचार आपण करणार की नाही?
आज मकर संक्रांत. आजच्या मुहूर्तावर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे तो उत्तरेकडे सरकू लागतो. त्यामुळे आजपासून दिवस मोठे होऊ लागतील आणि रात्री आकसू लागतील. वातावरणातील गारवा कमी होऊ लागेल आणि फाल्गुनातील हुताशनी पौर्णिमेनंतर तर ग्रीष्माचा अंगारकाल सुरू होईल. अनेक अन्य सणांप्रमाणे या संक्रांतीच्या सणास एक भौगोलिक, खगोलशास्त्रीय आधार असून त्यामुळे तो अन्य अनेक प्रांतांतही साजरा केला जातो. दक्षिण भारतीयांची संक्रांत पोंगल बनून येते तर पंजाबकडे ती लोहरी होते. हा दिवस यंदा मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वीचा. हा योगायोग सूचक. म्हणजे सर्व धर्म, भाषा, जाती यांचे समाजजीवनी रास्त प्रतिबिंब असलेल्या मुंबईसारख्या महापालिकेची निवडणूक या संक्रांतीच्या पाठीवर ‘किंक्रांत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी होणे हे या शहराच्या बहुआयामी परिचयास साजेसेच म्हणायचे. देशाची आर्थिक राजधानी असलेले हे या देशातील पहिले खरे महानगर. जगातील कोणत्याही महानगराचे मोठेपण हे त्याच्या उदारमतवादी मनोभूमिकेवरच अवलंबून असते. मानवी मनाची खिडक्यादारे बंद असलेले शहर कधीच महानगर होऊ शकत नाही आणि ज्या शहरातील नागरिक वैश्विक बंधुभाव सोडून असा ‘बंद’भाव कुरवाळू लागतात ते शहर आपले महानगरत्व गमावू लागते. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह निवडणुकीस सामोरे जाणाऱ्या २९ महापालिका खरोखरच ‘महा’ आहेत किंवा कसे याचा कौल या निवडणुकीत मिळेल.
म्हणूनच २०२६ सालचे मकर संक्रमण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे. खरे तर कमी-अधिक प्रमाणात हे सत्य साऱ्या देशातील शहरांनाही लागू होते. मुंबईप्रमाणे बेंगळूरुसारख्या शहरातही निवडणुकीची लगबग सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळेच सुरू झाली. मुंबईसाठी सर्वोच्च न्यायालयाने ३० जानेवारी मुदत दिली तर बंगळूरुसाठी ३० जून. म्हणजे न्यायालयाच्या रेट्याखेरीज आपण लोकशाहीच्या देखाव्यासाठीसुद्धा कष्ट घेत नाही. आपण ना शहरे वसवतो ना वसलेल्या शहरांना स्वत:च्या पायावर उभे राहू देतो. एवढी हजारो वर्षांची परंपरा वगैरे असलेल्या देशात वसवलेल्या शहराचा उल्लेख झाला की आठवते ते चंडीगड. जी साहेबी परंपरा आपण पुसून टाकू पाहतो त्या साहेबाची ही निर्मिती. त्यानंतर त्यातल्या त्यात उल्लेख करता येईल तो छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरचा आणि नव्या आंध्र प्रदेशची राजधानी अद्यापही होऊ न शकलेल्या अमरावतीचा. शहरे वसवावी लागतात. आपोआप वाढतात ते उकिरडे. ज्यांना आपण आज शहरे, महानगरे म्हणतो. परत हे आपले उकिरडेही स्वयंभू नाहीत. तेही पंगू. महापौर, नगराध्यक्ष आदी पदे केवळ शोभेची. त्यांना ना आर्थिक अधिकार ना प्रशासकीय! आपली नगरे, शहरे, महापालिका यांचे नियंत्रण केले जाते आयुक्त नामे अधिकाऱ्याकडून. हे आयुक्त नगरविकास खात्यास उत्तरदायी असतात आणि पुढील नियुक्तीत अधिक चांगली महापालिका ‘मिळवणे’ इतकाच उद्देश त्यातील अनेकांचा असतो. याचा थेट परिणाम आपल्या शहरजीवनावर झालेला दिसतो.
त्याचमुळे जगातील पहिल्या १०० आदर्श शहरांत आपली फक्त दोन-तीन शहरे आहेत. आपली क्रमवारीच मुळी २९ पासून सुरू होते. गल्लीतील गानकोकिळा बाहेर समूहगानातील एक इतकीच ओळखली जावी तसे हे. आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बेंगळूरु हे जागतिक क्रमवारीत २९ व्या क्रमांकावर होते आणि यंदा त्याची क्रमवारी आणखीच घसरेल. आपल्या देशातील राजधानी दिल्लीतील जगणे खुद्द दिल्लीकरांस नकोसे झाले आहे. हिवाळ्यात त्या शहरात राहणे आणि शेणा-मुताच्या वासाने भरलेल्या गोठ्यात राहणे यात दुसरा पर्याय अधिक आरोग्यदायी ठरावा इतकी दिल्लीतील हवा गचाळ. यंदा तर कहर झाला. हवा गुणवत्ता निर्देशांकाने ४०० काय, ५०० काय… कसलीच मर्यादा पाळली नाही. किमान आरोग्यदायी हवेसाठी हा गुणवत्ता निर्देशांक ५० च्या आत हवा. म्हणजे त्यात कमी प्रदूषक हवेत. या निकषावर आपल्या फारच कमी शहरांतील हवा श्वसनयोग्य ठरते. ज्या देशास मागे सारून आपण जगातील चौथी बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलो त्या इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये त्याच वेळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक एक इतका होता. आपल्या हवेचा दर्जा ४०० कोठे आणि इंग्लंडचा एक कोठे! यावरून केवळ सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढून चालत नाही, नागरिकांचे राहणीमानही सुधारणे आवश्यक असते, ही किमान बाब तरी आपल्या ध्यानात यावी. ती आल्यास आधुनिक मानवी जीवनात शहरांचे स्थान काय हे कळेल. समग्र मानवी संस्कृतीच्या विकासाचा उगम शहरांत झाला. म्हणून मानवी शिरगणती, खानेसुमारी ‘नागरिक’ या संज्ञेत होते. नगरांत राहणारे इसम हे नागरिक. मनुष्यप्राण्याने नगरात राहावे आणि ही नगरे छान वसवलेली असावीत. रोमन, ग्रीक साम्राज्याचा, आपल्या महाभारताचा, इतकेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही गौरवशाली शहर निर्मितीचा आहे.
त्या इतिहासापासून आपले वर्तमान दूर गेले ही यातील खरी वेदना. परिणामी आपल्याकडे खेड्यांची नगरे होतात आणि नगराच्या व्याख्येत ती मावेनाशी झाली की आपण त्यांना महानगरे संबोधू लागतो. आपले खरे महानगर एकच. मुंबई. हे शहर जन्माला आले ते महानगर म्हणूनच. एखादा जन्माला येतानाच बैठकीचा गवई म्हणून जन्मतो तसे हे. पण नुसते जन्मास येऊन पुरेसे नसते. नंतरचे संस्कारही तसेच लागतात आणि गवईपणासाठी आवश्यक ते पथ्यपाणीही सांभाळावे लागते. मुंबईच्या बाबत हे सुरुवातीस काही काळ सांभाळले गेले. पण आता या शहराची हेळसांड होऊ लागली आहे हे विद्यामान शासकही मान्य करतील. कारणे काहीही असोत. पण मुंबईचे जनुकीय मुंबईपण जपले जाण्यासाठी या शहरावर प्रेम करणारे शासक हवेत. मुंबईबाबत दैवदुर्विलास असा की ‘खेड्यामधले घर कौलारू’ म्हणत ग्रामीण जीवनाचे उदात्तीकरण करणारेही मुंबईत घर सांभाळून असतात. म्हणजे ज्याप्रमाणे पश्चिम आशियातील शेख हे पाश्चात्त्य देशी गेले की सुटाबुटात आणि मायदेशी वाळवंटी आले की अरबी वेशात तसे आपल्या राजकारण्यांचे आहे. कोणीही मी मुंबईसाठी काही भरीव करीन असे म्हणत नाही. कारण मुंबईसाठी काही करणे म्हणजे धनाढ्यांच्या बाजूने उभे राहणे आणि म्हणून ग्रामीण परिसराकडे दुर्लक्ष करणे असे मानले जाते. परिणामी मुंबईचा सर्वांस लाभांश तितका हवा. पण मुंबईसाठी काही करणे नको. या अशा दुटप्पी वर्तनाने मुंबईचे भले झाले नाही ते नाहीच; पण ग्रामीण परिसराचेही तितकेच नुकसान झाले. म्हणून आपला ग्रामीण परिसरही भकास आणि शहरे गचाळ.
या वास्तवाचा विचार करण्यासाठी फक्त आजचा दिवस हाती आहे. उद्या, १५ तारखेस आपापले नगर‘सेवक’ निवडण्यासाठी मतदान होईल. ते करताना आपल्या शहरांत पुन्हा कसे प्राण फुंकू शकतो याचा विचार आपण करणार की नाही, हा प्रश्न. कोणतीही ‘शाही’- मग ती हुकूमशाही असो वा लोकशाही- शहरांकडे दुर्लक्ष करून उभी राहू शकत नाही. उभी राहिलेली नाही. अगदी हिटलर वा स्टालिन यांनीही उत्कृष्ट शहर निर्मितीवर भर दिला आणि अमेरिका, फ्रान्स वा इंग्लंडसारख्या आदर्श लोकशाही व्यवस्थांनी शहरांचे योग्य ते कोडकौतुक केले. सबब महासत्ता म्हणून आपणास उभे राहावयाचे असेल तर आपली शहरे उत्तम असायला हवीत. भिकार रस्ते आणि ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्याकुंड्या वागवणारी शहरे असलेले देश कधीही मोठे होऊ शकत नाहीत. यंदा आपल्या शहरांवर आलेल्या संक्रांतीचा हा सांगावा.




