– अधिकाधिक संख्येत मतदान करा : आयुक्तांनी केले आवाहन
नागपूर :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक- २०२६ करिता गुरुवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ३००४ मतदान केंद्रात मतदान केले जाणार आहे. शहरातील मतदारांनी आपला हक्क व कर्तव्याचे वहन करावे,आणि अधिकाधिक संख्येत मतदान करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
नागपूर शहरातील २४,८३,११२ मतदार आपला मताधिकाराचा वापर करणार असून यामध्ये १२,२६,६९० पुरुष आणि १२,५६,११६ महिलांचा समावेश आहे. मतदारांना ३८ बहु सदस्यीय प्रभाग पद्धतीमधून १५१ सदस्यांची निवड करायची आहे. मतदारांना प्रभाग क्रमांक १ ते ३७ करिता ४ मत द्यायचे आहे, तर प्रभाग क्रमांक ३८ करिता ३ मत द्यायचे आहे. यावेळी ९९३ उमेदवार रिंगणात आहे. मतदानासाठी सर्व तयारी झाली असून, ५०४ बसेस मधून मतदान साहित्य आणि पथकाला मतदान केंद्रात पोहचविण्यात आले आहे. मतमोजणी १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून महानगरपालिकेच्या झोन स्तरावर १० ठिकाणी होणार आहे.

नागपूर महानगरपालिका तर्फे ९६४ इमारती मध्ये ३००४ मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. यासाठी ३५७९ केंद्राध्यक्ष आणि १०,७३७ मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रात १ पोलीस/ होम गार्ड राहणार असून, २४४ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रात किमान अत्यावश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागपूर पोलीस प्रमाणे संवेदनशील मतदान केंद्राची संख्या ३२१ असून, इथे आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदारांसाठी दहाही झोन मध्ये प्रत्येकी एक पिंक मतदान केंद्र आणि एक आदर्श मतदान केंद्रची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. माधवी खोडे-चवरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक निरीक्षक म्हणून संतोष थिटे त्यांना सहकार्य करणार आहेत. मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी बी सुद्धा मतदान आणि मतमोजणी प्रक्रीयावर नजर ठेवून आहे.
मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने नवे डीजीटल प्लॅटफॉर्म मतदारांना उपलब्ध करून दिले आहे. मतदारांना आता मतदान केंद्र मनपाच्या संकेतस्थळा सोबतच मनपाचे चॅटबॉट, एआय मित्र व माय नागपूर एॅपवर मतदान केद्र तात्काळ शोधता येणार आहे. यासंदर्भात या डीजीटल प्लॉटफॉर्मवर मनपाने आपले मतदान केंद्र ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात मतदारांना मतदार ओळखपत्रावर असलेले नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक (ईपीआयसी) नुसार शोधता येणार आहे. मतदाराला मराठी किंवा इंग्रजी भाषेचा नाव शोधण्यासाठी उपयोग करता येणार आहे. मतदारांनी ईपीक क्रमांकानुसार मतदान केंद्र शोधल्यास अधिक अचूक व तात्काळ माहिती मिळू शकेल.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर १० मतमोजणी केंद्राची स्थापना करण्यात आली असून, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारणतः प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कडे २० टेबल ईवीएम साठी तसेच पोस्टल बेलेट साठी ४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबल वर एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक सहायक नियुक्त करण्यात आले आहे.




