spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या चांदपुरात भक्तीचा महापूर; मकर संक्रांतीनिमित्त दक्षिणमुखी हनुमंताच्या दर्शनाला हजारो भाविक”

– ऐतिहासिक परंपरेच्या चांदपूर नगरीत श्रद्धेचा पूर; भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थान कमिटी सज्ज

हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- सातपुडा पर्वताच्या निसर्गरम्य सानिध्यात आणि उंच टेकडीवर वसलेल्या ऐतिहासिक चांदपूर देवस्थानात मकर संक्रांतीनिमित्त भाविकांचा जनसागर उसळला होता. जागृत हनुमान आणि लगतच असलेल्या ऋषी देवाचे दर्शन घेण्यासाठी काल सकाळपासूनच भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ, शेजारील मध्य प्रदेशातील बालाघाट आणि छत्तीसगड राज्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली.

चांदपूर हे गाव केवळ धार्मिक दृष्ट्याच नव्हे, तर ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात देवगडचे राजे बक्त बुलंदशहा यांनी भंडारा जिल्ह्याचा भाग आपल्या राज्यात जोडला, तेव्हा चांदपूर हा एक प्रमुख ‘परगाना’ होता. त्यानंतर चांद सुलतान यांचे बंधू चांदवली शाह यांनी या गावाची स्थापना केली. गोंड राजवटीत हे गाव लष्करी छावणीचे महत्त्वाचे केंद्र होते. विशेष म्हणजे, १८९२ पासून इंग्रज काळातही याला परगाना म्हटले जाई आणि १९६० पर्यंत पोस्टाचा व्यवहार ‘जिल्हा भंडारा, परगाना चांदपूर’ याच पत्त्याने चालत असे.

येथील हनुमानाची मूर्ती स्वयंभू असून ती ७ फूट उंच आहे. या मूर्तीचे मुख दक्षिणेकडे असले तरी नजर मात्र प्रभू रामचंद्रांच्या रामटेक नगरीकडे आहे, असे मानले जाते. या जागृत देवस्थानाला समर्थ रामदास स्वामींनीही भेट दिल्याची नोंद पुरातन दस्तऐवजात आढळते. पूर्वी या देवस्थानचा कारभार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळवरून चालत असे, हे येथील महत्त्वाचे ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे.

चांदपूर येथे केवळ हिंदूच नव्हे, तर मुस्लिम बांधवांचीही श्रद्धा आहे. टेकडीवर असलेल्या चांदशहावली यांच्या मजारवर दरवर्षी एप्रिलमध्ये उर्स भरतो. मकर संक्रांतीच्या निमित्ताने येथे हिंदू-मुस्लिम धार्मिक सलोख्याचे उत्कृष्ट दर्शन घडते.

यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेता, चांदपूर देवस्थान कमिटीच्या वतीने ठिकठिकाणी पार्किंग झोन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सिहोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय कसोधन यांनी आपल्या ताफ्यासह यात्रेवर बारीक लक्ष ठेवून चोख बंदोबस्त राखला. कोणतीही अनुचित घटना न घडता भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले.

पोळा, ऋषिपंचमी, हनुमान जयंती आणि मकर संक्रांत या सणांना येथे मोठी यात्रा भरते. यावर्षीही देवस्थान कमिटी आणि पोलीस प्रशासनाच्या नियोजनामुळे भाविकांना सुखद दर्शन घेता आले.

Popular Articles