spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजेंगाव येथे वाघाये महाविद्यालयाच्या ‘रासेयो’ शिबिराचा थाटात समारोप

हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी :- येथील स्वर्गीय निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने राजेंगाव/मोरगाव येथे आयोजित सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचा समारोप नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या या शिबिरातून विद्यार्थ्यांनी श्रमदान आणि समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुखचंद हनवतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून राजेंगावच्या सरपंच गायत्री वाघ, उपसरपंच मनोहर पटले, माजी सरपंच नाजूक भैसारे, तंटामुक्ती अध्यक्ष पृथ्वीराज पारधीकर, डॉ. सुधाकर शेंडे, डॉ. यु. पी. सहारे, डॉ. सुधीर सहारे आणि डॉ. चंद्रशेखर देवघरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते गणेश टेकाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशासन आणि शिस्तीची भावना रुजते.” सरपंच  गायत्री वाघ यांनी विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून, गुरूंचे मार्गदर्शन घेऊन उच्च पदस्थ अधिकारी बनावे आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.

उपसरपंच मनोहर पटले यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना “आपण स्वच्छ तर जग स्वच्छ” असा संदेश दिला. माजी सरपंच नाजूक भैसारे यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात कर्तव्यदक्ष नागरिक होऊन देशसेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांनी केले. त्यांनी सात दिवसांच्या शिबिरात राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस्सी. अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रियांशु मेश्राम याने केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. चंद्रशेखर देवघरे यांनी मानले. या समारोप कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक आणि राजेंगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles