पांढरकवडा :- ‘सिने संगीत शौकीन मंच’ तर्फे सुरांची मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच डॉ. मयूर कडू यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडले. जुन्या-नव्या गाण्यांच्या या सुश्राव्य मैफलीने पांढरकवडा येथील रसिक मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन, सरस्वती आणि गणेश पूजनाने झाला. भारती विनायक कडू यांनी अतिशय भावपूर्ण रीतीने ‘शारदा स्तवन’ सादर केले. मुख्य सादरीकरणापूर्वी स्व. विमलताई नानाजी उपलेंचवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सुरांची मैफलीत सुमारे ३२ गायकांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. विशेषतः डॉ. मयूर कडू आणि डॉ. तृप्ती कडू यांच्या कन्या नेत्रा (५ वर्षे) आणि समायरा (७ वर्षे) यांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली. डॉ. मयूर कडू यांच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मंचचे संयोजक दीपक अण्णा कापर्तीवार यांनी प्रास्ताविकात, अशा कार्यक्रमांमुळे समाजात आनंदी आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा. तेजश्री मानेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण झीलपीलवार, प्रेमराव वखरे, राहुल भानेगावकर, स्वप्नील कुळकर्णी, डॉ. संजूभाऊ घावडे, डॉ. अंगाईतकर, शंकरराव सातपुते, मुग्धा ताई, महेश अक्केवार, आणि मंचच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण कडू परिवाराने या कार्यक्रमासाठी अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था आणि स्नेहभोजनाचे नियोजन केले होते. शेवटी भारती कडू यांनी सर्व गायक आणि श्रोत्यांचे आभार मानले.








