spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महालगांव (मोर) ग्रामपंचायतीत नियम धाब्यावर बसवून सभेचे आयोजन; आक्रमक सरपंचांची निलंबनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

– घटनात्मक अधिकारांचा अपमान केल्याचा आरोप; दोषी ग्रामसेविकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी

हंसराज प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- मोहाडी तालुक्यातील महालगांव/मोर ग्रामपंचायतीत प्रशासकीय अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. येथील ग्रामसेवक मीनाक्षी मधुकर फटकाळ यांनी सरपंच बबिता श्रीधर उईके यांना पूर्णपणे अंधारात ठेवून आणि ग्रामपंचायत नियमांचे उल्लंघन करून मनमानी कारभार सुरू केल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून संबंधित ग्रामसेविकेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार, ग्रामसभा आणि मासिक सभा बोलावण्याचे सर्वस्वी अधिकार हे सरपंचांना आहेत. मात्र, महालगांव (मोर) येथे ग्रामसेविकेने सरपंचांना कोणतीही माहिती न देता किंवा त्यांची स्वाक्षरी न घेता स्वतःच्या अधिकारात सभांचे आयोजन केले.

१८ जानेवारी २०२६ रोजी परस्पर नोटीस काढून २६ जानेवारीची ‘ग्रामसभा’ आयोजित केली, तर २० जानेवारी रोजी स्वतःच्या स्वाक्षरीने पत्रक काढून २७ जानेवारीची ‘मासिक सभा’ बोलावली. या दोन्ही प्रक्रियेत सरपंचांना पूर्णपणे डावलण्यात आले असून, नोटशीटवर त्यांची संमतीही घेण्यात आली नाही.

प्रजासत्ताक दिनी सरपंचांचा अपमान?

देशाच्या प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) ग्रामपंचायत कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमात सरपंचांचे स्थान महत्त्वाचे असते. मात्र, सरपंचांना कोणतीही कल्पना न देता आणि त्यांच्या अनुपस्थितीत ग्रामसेविकेने ध्वजारोहण उरकून घेतले. हा केवळ सरपंचांच्या घटनात्मक अधिकारांचा अपमान नसून लोकशाही मूल्यांचे पायदळ असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामसेविकेच्या या वागणुकीमुळे गावातील विकासकामांवर आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर विपरीत परिणाम होत आहे. “ग्रामसेविका आपल्या अधिकारांचा गैरवापर करून सरपंचांच्या अधिकारांवर गदा आणत आहेत. अशा मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही,” असे सरपंच बबिता उईके यांनी म्हटले आहे.

या तक्रारीच्या प्रती विभागीय आयुक्त (नागपूर), जिल्हाधिकारी (भंडारा), मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. भंडारा) आणि गटविकास अधिकारी (पं.स. मोहाडी) यांना पाठवण्यात आल्या असून, दोषी ग्रामसेविकेवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गावपातळीवरून होत आहे.

Popular Articles