कामठी :- स्थानिक नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र 17 येथील कुंभारे कॉलोनी, सम्राट नगर,छत्रपती नगर आदी भाग हे दलित वस्तीत समावेशक असून दलित वस्त्यांचा विकास व्हावा या मुख्य उद्देशाने शासनाकडून दरवर्षी नगर परिषद ला करोडो रुपयाचा निधी प्राप्त होत असतो मात्र येथील नगर परिषद प्रशासनाच्या कामचुकार कार्यप्रणालीमुळे या दलित वस्त्यांचा विकास न झाल्याने वसत्त्या बकास झाल्या आहेत तर बिडी कामगारांची वसाहत म्हणून प्रसिद्धीस असलेल्या कुंभारे कॉलोनीत दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे.ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरातील नागरिकाना गॅस्ट्रो,डायरिया,अतिसार, डीहायड्रेशन ची शक्यता होऊ शकते ज्याला नाकारता येत नाही तेव्हा नगर परिषद प्रशासनाने प्रभाग क्र 17 अंतर्गत रहिवासी नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुव्यवस्था करून द्यावी अन्यथा नगर परिषद प्रशासन विरोधात माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या मार्गदश्नार्थ बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या वतीने तीव्र आंदोलन पुकारणार असल्याचा ईशारा प्रभाग क्र 17 चे नवनिर्वाचित नगरसेवक व बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे सक्रिय कार्यकर्ता आकाश भोकरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले.
पूर्वी कामठी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषद ला महानगर पालिकेकडून पाणी विकत घ्यावे लागत होते त्यातही फक्त 3.6दशलक्ष लिटर्सप्रतिदिन इतकेच पाणी मिळत होते त्यामुळे कामठी शहरात पाण्याची भीषण टंचाई होती यावर मात करण्यासाठी शहरात स्वतंत्र पाणी पुरवठा ची सोय व्हावी यासाठी माजी राज्यमंत्री एड सुलेखा कुंभारे यांनी आंदोलने केली व या संघर्षशील नेतृत्वाने कामठी शहरासाठी स्वतंत्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवीत 28.25कोटीच्या निधीतून 16 एप्रिल 1998 ला तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे,तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.नितीन गडकरी , माजी राज्यमंत्री एड सुलेखा कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले होते.तर 19 डिसेंबर 2001 ला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख , तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या शुभ हस्ते या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले यानुसार शहरव्यतिरिक्त आजनी, गादा,घोरपड, रनाळा व येरखेडा ह्या पाच गावाला ही पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली होती तर संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर नंतर विदर्भातील एकमेव कामठी येथे 11 हेक्टर जागेत 750 घरकुलांची बिडी कामगारांसाठी घरकुल योजना यशस्वी करीत सुलेखाताईच्या अथक प्रयत्नातून कुंभारे कॉलोनी नामक बिडी वसाहत वसविण्यात आली मात्र ज्या राज्यमंत्रीच्या अथक प्रयनातून शहरात स्वतंत्र पाणी पुरवठा ची सोय करीत शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात आला त्याच सुलेखाताईच्या अथक प्रयत्नातून वसलेल्या बिडी कामगारांच्या वसाहत कुंभारे कॉलॉनीत अजूनही पाण्याचा ठणठणाट असून दूषित पाणीपुरवठा होतो याची खंत आहे.
कामठी नगर परिषद तर्फे होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे कामगार नगर रहिवासी एका विवाहित महिलेचा तडकाफडकी मृत्यू झाला होता तेव्हा अश्याच घटनेची पुरावृत्ती कुंभारे कॉलोनीत होईल तेव्हा नगर परिषद प्रशासनाला जाग येईल का?असा प्रश्न येथील जागरूक नागरिकांच्या वतीने नगरसेवक आकाश भोकरे करीत आहेत.








