spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राऊतांनी राजकारण सोडून मनोरंजक वेबसीरीजची पटकथा लिहावी

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची खोचक टिप्पणी

मुंबई :- अजित पवार स्वगृही परतण्यासाठी इच्छुक होते असे बिनबुडाचे वक्तव्य करणारे संजय राऊत हे जाणूनबुजून एखाद्या रहस्यमय, मनोरंजक वेबसीरीजप्रमाणे चटपटीत पटकथा लिहून खोटी माहिती पसरवत आहेत. अजित पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्ये करणा-या राऊतांनी याबाबत ठोस पुरावे सादर करावेत असे खुले आव्हान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी दिले. खासदारकी भूषवत खोटे आरोप करण्याची सवय जडलेल्या राऊतांनी खासदारकी व राजकारण सोडून ओटीटीसाठी दिग्दर्शन, पटकथा लेखन करावे म्हणजे राऊतांचे दुकान चालेल अशी बोचरी टीकाही बन यांनी केली. अजितदादा स्वगृही परतण्यासाठी इच्छुक कधीच नव्हते. मात्र ते इतर घटकांना एनडीएमध्ये सामील करण्यासाठी प्रयत्नशील होते का हे देखील पहावे लागेल अशी पुस्ती बन यांनी जोडली.

राऊतांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ऑपरेशन लोटस दिसते

अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग अशी हिणकस टीका भाजपावर करण्याआधी याबाबत ठोस पुरावे सादर करावेत. उगाच हवेत बाण सोडायचे काम करू नये असे म्हणत बन यांनी राऊतांवर कोरडे ओढले. भूकंप, त्सुनामि, पूर आला तरीही राऊत यांना यात ऑपरेशन लोटस दिसते हे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघातच

अजितदादांचा विमान अपघात हा अत्यंत दुर्दैवी होता. केंद्र सरकार आणि राज्य सरकार विमान अपघाताची चौकशी करत असून या चौकशीतून सत्य उलगडेल असे  बन म्हणाले. शरद पवार यांनीही स्पष्ट केले की हा अपघात होता यामागे घातपात नाही. राऊत हे शरद पवार यांच्यापेक्षा बुद्धिमान आहेत का असा सवाल उपस्थित करून बन म्हणाले की उद्या कोर्टाचा निर्णय आल्यानंतर सुद्धा राऊत म्हणतील की कोर्ट विकले गेले आहे. राऊतांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नसून त्यांनी पाकिस्तानच्या कोर्टात जावे असा खोचक सल्लाही दिला. या संपूर्ण प्रकरणात राऊत मात्र जाणीवपूर्वक खोटे नरेटिव्ह पसरवत आहेत. सातत्याने अजित दादांचा अपमान करणा-या राऊतांना अचानक अजितदादांप्रति प्रेम उफाळून आले आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे हीन काम संजय राऊत करत आहेत अशी प्रखर टीकाही त्यांनी केली.

राऊत एकाच पत्रकार परिषदेत परस्परविरोधी भूमिका मांडतात

दररोज पत्रकार परिषदेतून खोटे बोलायचे हा राऊतांचा व्यवसाय झाला आहे. भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल अजितदादांकडे होती म्हणून म्हणे हे घडवून आणले असा बेताल आरोप राऊत करतात आणि त्याच पत्रकार परिषदेच्या शेवटी राऊत म्हणतात की पार्थ पवारांना भाजपा वाचवत आहे. एका पत्रकार परिषदेत तरी राऊतांनी एक भूमिका मांडावी. परस्परविरोधी वक्तव्ये करून राऊत हे स्वत:चेच वक्तव्य खोडून काढण्याचे काम करत असून भान सुटल्यासारखे असंबद्ध बरळत आहेत अशी घणाघाती टीकाही बन यांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.