– प्रेक्षक मंत्रमुग्ध : सुदेश भोसले व साधना सरगम यांच्या सुरांची जादू
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- अपनी तो जैसे तैसे कट जाएगी…’, ‘सारा जमाना हसीनों का दिवाना’ … ‘ ओम शांती ओम हिंदी-मराठी गाण्यांनी साकारलेली एक अविस्मरणीय संगीतमयसंध्या रामटेक सांस्कृतिक महोत्सवात रामटेकरांना सोमवार (दि.२) ला अनुभवायला मिळाली. सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी आपल्या बहारदार गीतांचे सादरीकरण करत प्रेक्षकांच्या गराड्यात घुसून सर्वत्र संगीतमय वातावरण निर्माण केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रेक्षकांनीही ताल धरला. तर; भोसले यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरश झुंबड उडाली. लोकप्रिय गीते सादर करत वातावरण सुरेल केले. पार्श्वगायिका साधना सरगम यांच्या ‘पेहला नशा पेहला खुमार…, ‘निले निले अंबर पर.. या बहारदार गाण्यांच्या सादरीकारणाने रामटेककर अक्षरशः भारावले. मंचावर आल्यानंतर सुदेश भोसले आणि साधना सरगम यांनी आपल्या दमदार आणि भावस्पर्शी सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. अशा बहारदार गाण्यांच्या मालिकेने भोसले यांनी संगीत उत्सवाचा चढता क्रम गाठला. प्रेक्षकांनी व्यासपीठासमोर येऊन विविध गाण्यांवर नृत्य करत धम्माल केली. राज्य शासनाच्या वतीने आयोजित व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तीन दिवसीय या अविस्मरणीय संगीतमय कार्यक्रमाने रामटेक सांस्कृतिक महोत्सवाची सांगता झाली. गायन कार्यक्रमापूर्वी कलावंत शुभम चोपकर बासुरीवाला व त्यांच्या संचाने उत्कृष्ट सादरीकरण केले. एका दिव्यांग गायकाने गायलेल्या पोवाड्याचे लोकार्पण करण्यात आले. नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन व उपविभागीय अधिकारी प्रितेश महाजन यांच्या हस्ते विविध विभागांच्या सहकार्याचा सन्मान करण्यात आला. कबड्डी, कुस्ती, मॅराथॉन, स्केटिंग, नौकानयन, हॉट एअर बलूनिंग अशा उपक्रमांनी नटलेला हा तीन दिवसीय महोत्सव दिग्गज कलावंतांच्या गायनाने संस्मरणीय ठरला. समारोपीय कार्यक्रमाचे बहारदार संचालन आसावरी गलांडे यांनी केल.
उत्स्फूर्त प्रतिसादाचा वर्षाव
दुसऱ्या सत्रात सुदेश भोसले, साधना सरगम, चेतन राणा व प्रिया चव्हाण यांच्या संयुक्त सादरीकरणाने तरुणाई थिरकली. ‘तेरे जैसा यार कहां…, यम्मा यम्मा…’ जुम्मा चुम्मा दे दे…., ‘ एक हसीना थी एक दीवाना था…. अशा लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये ऊर्जा आणली. अखेर, ‘अभी अलविदा ना कहना…’ या गीताने रात्री संगीत प्रवासाचा मनमोहक शेवट केला. सुदेश भोसले यांच्या जादुई आवाजाने अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक प्रेक्षकांनी अनुभवली. तर; त्यांच्या प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा आणि उत्स्फूर्त प्रतिसादाचा वर्षाव झाला. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनीही गायन करून प्रेक्षकांची दाद मिळवली.








