कामठी :- स्थानिक पोरवाल महाविद्यालयाने घोरपड (शिरपूर) येथे रासयोतर्फे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरांतर्गत 04 फेब्रुवारी 2026 रोजी “योग आणि आरोग्य – मधुमेहाचे वैज्ञानिक समाधान” या विषयावर महत्त्वपूर्ण व्याख्यान आयोजित केले. या प्रसंगी सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय, कामठी येथील शारीरिक शिक्षण विभागाचे असोसिएट प्राध्यापक डॉ. जयंत कुमार रामटेके यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात डॉ. रामटेके यांनी सांगितले की, अनेकदा हलका आहार घेतल्यावर किंवा गोड पदार्थ टाळल्यावरही सकाळची फास्टिंग शुगर वाढते. यामागील मुख्य कारण म्हणजे ताणतणाव, चिंता आणि झोपेअभावी होणारे हार्मोनल बदल. त्यांनी कॉर्टिसोल व अॅड्रेनालिनच्या वाढत्या पातळीमुळे इन्सुलिन रेसिस्टन्स वाढते, असे स्पष्ट केले तसेच ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियेद्वारे लिव्हर शुगर तयार करते याची वैज्ञानिक माहिती दिली.
त्यांनी योग, प्राणायाम आणि ध्यानाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित सरावामुळे ताण कमी होतो, स्नायू सक्रिय राहतात आणि शरीराची शुगर नियंत्रण क्षमता वाढते, असे सांगितले. तसेच दररोज 30 ते 45 मिनिटे ब्रिस्क वॉक, पुरेशी झोप, डिजिटल डिटॉक्स आणि नियमित आरोग्य तपासणी यांसारख्या जीवनशैलीतील बदलांची गरजही त्यांनी स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तक ग्राम अभियान व ग्रामोन्नती प्रकोष्ठाचे संयोजक तसेच इतिहास विभागप्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी योग आणि आरोग्याचा इतिहास सांगत योग समाजहितासाठी सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत व तंत्रात पोहोचवण्याचे आवाहन केले. रासयो स्वयंसेवकांच्या श्रमदान, योग सत्रे आणि “युवा मेरे भारत अभियान”मधील सक्रिय सहभागाचे त्यांनी कौतुक त्यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय व्यवस्थापन, शिबिर संयोजक डॉ. विनोद शेंडे, डॉ. निशिता अंबादे (महिला कार्यक्रम अधिकारी) तसेच आयोजन समितीचे सदस्य— डॉ. दीपक भावसागर, डॉ. राजेश पराते, डॉ. रश्मी जाचक, डॉ. तारुण्य मुलतानी आदींचे विशेष योगदान राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनुश्री कडसाल यांनी केले तर आभार प्रदर्शन रिया चंद्रोल यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे महत्त्व अधिक दृढ झाले. आयोजकांनी भविष्यातही असे जनजागृतीपर कार्यक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.




