spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापौरांनी विकास कामांचा आढावा घेतला; पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश

चंद्रपूर :- महापौर संगीता खांडेकर यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांचा आढावा शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी घेतला. शहरातील सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रकल्पांचा प्रगती अहवाल तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीदरम्यान महापौरांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था आणि शहर सौंदर्यीकरण या विषयांवर विशेष भर दिला. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित राहावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस निर्देश देण्यात आले.

महापौरांनी सांगितले की,शहरातील सर्व जलकुंभ व पंपिंग स्टेशनची नियमित तपासणी करावी,गळतीच्या तक्रारी तात्काळ दुरुस्त करून पाण्याची नासाडी टाळावी,कमी दाबाच्या भागांमध्ये अतिरिक्त टँकरची व्यवस्था करणे,नागरिकांच्या तक्रारींवर २४ तासांत कार्यवाही करावी,जलशुद्धीकरण प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी नियमित करावी, जेणेकरून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळेल, अमृत योजनेत जी कामे अपुर्ण आहेत ती त्वरेने पूर्ण करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आयुक्तांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला. पाणीपुरवठा विभागाने आवश्यक तेवढा पाणीपुरवठा व्हावा यासाठी पुढील दोन महिन्यांचे लक्ष्य ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

महापौरांनी स्पष्ट केले की नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असून पाणी हे जीवनावश्यक असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहण्याचेतसेच शासनाच्या योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम आपले आहे ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचेही निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले.

याप्रसंगी आयुक्त अकुनुरी नरेश,उपमहापौर प्रशांत दानव,नगरसेवक राहुल पावडे,रवि लोणकर,उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी,शहर अभियंता रवींद्र हजारे,सर्व सहायक आयुक्त, सर्व विभागप्रमुख उपस्थीत होते.

Popular Articles