spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इतवारी बाजार परिसरात रात्रपाळीत सुरू होणार सफाई अभियान

– महापौर निता ठाकरे यांची व्यापारी संघटनांशी चर्चा

नागपूर :- नागपूर शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे इतवारी बाजार परिसरात रात्रकालीन सफाई अभियान राबविण्यात येणार असल्याची संकल्पना  महापौर निता ठाकरे यांनी आज विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत मांडली. या संकल्पनेला दाद देत आम्ही देखील संपूर्ण सहकार्य करू, असे वचन व्यापारी संघटनांनी महापौर यांना दिले.

महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड आणि सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी इतवारी परिसरातील किराणा असोसिएशन, सराफा बाजार, सोने-चांदी मार्केट, स्टील ॲड मेटल मर्चेंट असोसिएशन, कापड बाजार आणि बर्तन ओली इत्यादी संघटनांच्या प्रतिनिधींशी बाजारपेठेतील रात्रिकालीन स्वच्छतेविषयी चर्चा केली.

याप्रसंगी नगरसेवक राम आंबुलकर, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, नागपूर सराफा संघटनेचे अनुप उदापूरे, अभिषेक अग्रवाल, राज शाहू, अंशुल हरडे, मेटल मर्चंट असोसिएशनचे पुरुषोत्तम ठाकरे, अनाज बाजारचे  संतोष कुमार अग्रवाल, कपडा बाजारचे प्रताप थारवानी, प्रकाश डागा, रामातवार तोतला, घनश्याम राठी, ओमप्रकाश जाजू, उमाकांत जाजू, नितीन जैन, राकेश शाहू, संजय खीचे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

चर्चे दरम्यान इतवारी येथील व्यापारी संघटनांनी सीताबर्डी च्या धर्तीवर रात्रीची सफाई, पार्किंग सुविधा, अतिक्रमण निर्मूलन आणि सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्याची विनंती केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत महापौर निता ठाकरे आणि सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सफाई अभियान व कचरा संकलन वाहने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

हा उपक्रम सुरुवातीला एक महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, या मोहिमेची माहिती दुकानदारांना पत्राद्वारे देऊन त्यांना जागरूक करावे, अशी सूचना महापौरांनी व्यापारी संघटनांना केली. ज्या भागात ‘फूड मार्केट’ आहे, तिथेही रात्री उशिरा स्वच्छता केली जाईल. दुकानदारांनी कचरा रस्त्यावर न फेकता महानगरपालिकेने निश्चित केलेल्या वेळेत कचरा संकलन वाहनात टाकावा, असे आवाहन सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले. यावेळी रविवारी देखील सफाई करण्याची मागणी केली. यावर महापौरांनी प्राप्त सूचनांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच व्यापारी वर्गानेही सफाईसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

या भागात होणार सफाई

मनपातर्फे रात्रपाळीत इतवारी भागातील मारवाडी चौकी, एक रुपया चौक, भारत माता चौक, गांधी पुतळा, अग्रसेन चौक, दहिबाजार, मस्कासाथ, तीन नल चौक, नंगा पुतळा, अनाज बाजार, कपडा ओली, बर्तन ओली व या भागातील रहिवासी परिसरात रात्रपाळीत सफाई अभियान आणि कचरा संकलन वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.