हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी :- बदलत्या काळानुसार शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाला असून, महाराष्ट्र शासनाचे ‘महाविस्तार एआय’ (Mahavistar AI) हे ॲप शेतीमध्ये खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती घडवून आणणारे साधन ठरेल, असा सूर लाखनी येथील स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात आयोजित सेमिनारमध्ये उमटला. महाविद्यालयाच्या भूगोल व रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘कृषी क्षेत्रातील डिजिटल क्रांती’ या विषयावर एकदिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना मंडळ कृषी अधिकारी प्रशांत भोयर म्हणाले की, “आजच्या काळात शेतकऱ्यांसमोर हवामान, बाजारभाव, कीड-रोग आणि सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळवणे हे मोठे आव्हान आहे. या सर्व समस्यांवर ‘महाविस्तार एआय’ हे अत्याधुनिक ॲप प्रभावी उपाय आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचे एक महत्त्वाचे साधन आहे.”
सहायक कृषी अधिकारी अपूर्वा गहाणे यांनी विद्यार्थ्यांना ॲप डाउनलोड करण्यापासून त्याच्या वापरापर्यंतचे सविस्तर प्रात्यक्षिक दिले. त्या म्हणाल्या, “कृषी विभागाच्या विविध योजना, पीक विमा आणि अनुदानासाठी आता शेतकऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप मराठी भाषेत उपलब्ध असून, एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध करून देते. ग्रामीण भागातील शेतकरीही याचा सहज वापर करू शकतात.”
यावेळी कृषी अधिकारी जे. सी. वाढई यांनी ॲपमधील ‘स्मार्ट रोगनिदान’ प्रणालीवर प्रकाश टाकला. “पिकावरील रोगाचा फोटो अपलोड करताच एआय तंत्रज्ञानाद्वारे त्याचे अचूक निदान होऊन उपाय सुचवले जातात. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून हे ॲप प्रत्यक्ष डाउनलोड करून घेऊन त्यांना प्रशिक्षित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी आपल्या एम.फिल. व पीएचडी संशोधनातील (भंडारा जिल्ह्यातील कृषी व जलसिंचन) उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाची माहिती आपल्या पालकांपर्यंत पोहोचवून घरातूनच डिजिटल क्रांतीची सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन रसायनशास्त्र विभागाचे प्रा. सागर वारंगणे यांनी केले, तर आभार प्रा. श्रद्धा बोरकर यांनी मानले. या प्रसंगी भूषण देशमुख, डॉ. शेंडे, डॉ. मंगेश वंजारी, डॉ. सुधीर सहारे, प्रा. तुषार डोंगरवार यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.








