नागपूर :- महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वन्यप्राण्यांचे वेगवेगळे किस्से पाहायला मिळतात. या व्याघ्रप्रकल्पात वाघ आणि अस्वल कित्येकदा समोरासमोर आलेले दिसून येतात. याक्षणी ना वाघ झुकतो, नाही अस्वल. दोघेही एकमेकांसमोर आवेशात उभे राहतात. दोघांनीही एकमेकांना दिलेल्या आव्हानांचा असाच एक क्षण बेलारा बफर क्षेत्रात वन्यजीव छायाचित्रकार संजय भारंबे यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या जंगलात अचूकपणे टिपला आहे.
वाघ हा सर्वात खतरनाक प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. एकदा काय त्याने शिकार करण्याचा निर्णय घेतला, की मग त्या प्राण्याला खुद्द यमराज देखील वाचवू शकत नाही असे म्हणतात. कारण वाघ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करतो. त्यामुळे वाघाला सहसा जंगलातील कोणताही प्राणी आव्हान देत नाही. जंगलाचा राजा सिंह देखील कधी वाघाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र अस्वलाने वाघाला आव्हान दिल्याचे अनेक किस्से आहेत. रणथंबोरच्या जंगलात जसे हे दृश्य नेहमीच दिसून येते, तसेच महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सुद्धा हे दृश्य नेहमीच दिसून येते. या आव्हानात कित्येकदा वाघाला माघार घ्यावी लागली आहे.
अस्वल जंगलातून जात असताना अचानक एक वाघ त्याच्या वाटेत येतो. अस्वल शांत असला तरी ते हिंसक तसेच अत्यंत क्रूर असू शकतो. आता जेव्हा दोन बलाढ्य प्राणी समोरासमोर असतात तेव्हा एकमेकांना पाहून दोघांनीही सावध राहणे अत्यावश्यक आहे. येथेही नेमके तेच घडते. अस्वलाला पाहून वाघ काहीच करत नाही. पण अस्वल त्याच्यापेक्षा कमी भीतीदायक असल्याने तो त्याच्या वतीने त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच थांबतो. अस्वलाने वाघासमोर आपल्या आक्रमक मुद्रेचे प्रदर्शन केले आहे. वाघाला सर्वच प्राणी घाबरतात मात्र या अस्वलाने असे काही केले की वाघही पाहतच राहिला. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ही घटना घडली आहे. जंगली प्राणी आणि त्यांच्या करामती आपण नेहमीच पाहत असतो. मात्र, अस्वल आणि वाघ समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात जी श्रेयवादाची लढाई होते, वर्चस्वाचे आव्हान एकमेकांना दिले जाते, ते पाहणे खरोखरच फारच कमी पर्यटकांच्या नशिबात असते. या छायाचित्रात देखील अस्वलाने वाघासमोरच आपल्या आक्रमकतेची चुणूक दाखवली आहे.




