वर्धा :- रस्त्यावरील भटके कुत्रे किती हिंस्त्र ठरू शकतात, याचे दाखले खुद्द देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. म्हणून अश्या कुत्र्यांपासून सावध राहण्यासाठी विविध उपाय योजन्याचे निर्देश शासनास दिले. शिक्षक वर्गाने अशी कुत्री शाळा किंवा संस्था परिसरात असल्यास त्याची नोंद घ्यावी म्हणून राज्य शासनाने निर्देश दिले. पण हे काम शिक्षकांचे नव्हे, अशी ओरड झाली. पण ही बाब म्हणजे भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रकार किती घातक व जीवावर बेतू शकतात, याचा दुर्दैवी प्रकार घडलाच.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. अवघ्या ८ वर्षांच्या धवल गुल्हाने या चिमुकल्याचा बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर मृत्यू झाला. २५ जानेवारी रोजी भाकरे ले-आऊट परिसरात खेळत असताना बेवारस कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. गालावर आणि हातावर गंभीर जखमा झालेल्या धवलला तातडीने उपचारासाठी आर्वीतून अमरावती आणि पुढे नागपूर येथे हलविण्यात आले; मात्र १६ तारखेला नागपूर मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. एका निरागस हास्याचा कायमचा अंत झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
कुत्र्याचा चावा किती भयंकर असू शकतो, याची ही जिवंत आणि वेदनादायी घटना ठरली आहे. किरकोळ वाटणारी जखम कधी जीवघेणी ठरते, हे धवलच्या मृत्यूने अधोरेखित केले. गेल्या महिनाभरापासून आर्वी शहरात बेवारस कुत्र्यांची दहशत वाढली असून विविध प्रभागांमध्ये सुमारे १२ जणांवर हल्ले झाल्याची माहिती आहे. नागरिकांकडून नगर परिषद प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप केला जात असून तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
धवलच्या जाण्याने एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला, तर शहरातील पालकांच्या मनात भीतीचे सावट दाटले आहे. निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. भविष्यात अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी ठोस आणि त्वरित पावले उचलण्याची गरज आता अधिक तीव्र झाली आहे.
आर्वी शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक टाके यांनी सातत्याने लक्ष वेधले आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्याकडे पण हा प्रश्न मांडण्यात आला. त्यांनी पालिकेस सूचना पण केल्यात. पण सर्व ढिम्म.




