– महिलांना रोजगार, प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी मिळेल
नागपूर :- शहरातील सीताबर्डी येथील दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘सोनचिरैया’ शहरी उपजीविका केंद्र, स्टिचिंग क्लस्टर आणि प्रशिक्षण केंद्राला महापौर निता ठाकरे यांनी बुधवारी (ता. ११) भेट देत पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, समाज विकास विभागाचे विनय त्रिकोलवार, विनीत टेंभूर्णे, आरोह संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मिष्ठा गांधी यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
केंद्रामध्ये उभारण्यात आलेल्या शॉपिंग मॉलमध्ये नागपूर जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहातील महिलांना रोजगार, प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन महापौर निता ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

महापौर निता ठाकरे यांनी स्टिचिंग क्लस्टर आणि प्रशिक्षण केंद्रातील महिलांची संवाद साधला व मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी उपजीविका केंद्रातील विविध वस्तू उत्तम, टिकाऊ आणि सुंदर असल्याचे सांगत, नागरिकांना या सर्व वस्तू माफक दरात उपलब्ध व्हाव्यात, तसेच या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, हा याचा मूळ उद्देश असल्याचेही महापौर निता ठाकरे यांनी सांगितले. केंद्रातील महिला कशा काम करतात हे त्यांनी यावेळी जाणून घेतले. वस्तूंची गुणवत्ता, दर्जा व किंमत योग्य असावी, बाजारातील इतर वस्तूंच्या तुलनेत आपल्या वस्तू अधिक चांगल्या असाव्यात, तसेच नागरिकांनी अधिकाधिक संख्येत केंद्राला भेट द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहनही महापौरांनी केले.
सीताबर्डी येथील सोनचिरैया या उपजीविका केंद्रात (शॉपिंग मॉल) विविध स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू जसे चिवडा-चकली, पापड, शेवया, लोणचे, मसाले असे उत्तमरीतीने व स्वच्छता बाळगून तयार केलेले खाद्यपदार्थाचे प्रकार, घर सुशोभीकरणाच्या वस्तू जसे मॅट, वॉल हँगिंग, रांगोळ्या, पेन्टिग, कंदील, दिवे आदी वस्तू, महिलांकरिता आकर्षक असे लुगडी-पातळ, ड्रेस माफक दरात उपलब्ध आहे व तसेच शिवून देखील मिळेल. देव-पूजेला लागणारे साहित्य, तसेच बाग-बगिच्यात कामाकरिता विविध प्रकारचे खत अशा अनेक उपयोगी वस्तू उपलब्ध आहेत.

याठिकाणी महिलांसाठी स्टिचिंग क्लस्टर कार्यरत असून त्याद्वारे महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनण्याची आणि स्वतःचा छोटा व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध होत आहे. घराची जबाबदारी सांभाळत महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आपल्या कौशल्याला वाव मिळत असून त्या स्वबळावर कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी योगदान देत आहेत.
स्टिचिंग क्लस्टरच्या माधमातून आजवर ६८ महिलांनी स्टिचिंग क्लस्टरचे प्रशिक्षण घेतले असून, यातील ३५ महिला केंद्रात कार्यरत आहेत व २२ महिला घरून काम करीत आहेत. प्रशिक्षण प्राप्त महिलांना विविध खाजगी व व्यवसायिक संस्थांकडून कार्य मिळत आहे. याआधारावर त्यांना ४ ते ५ हजार रुपयांचे मानधन प्राप्त होत आहे. तसेच त्यांना मनपाद्वारे विविध कार्य प्रदान करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यानुषंगाने त्यांच्या मानधनात वाढ होत आहे. प्रायमरी सिलाई मशीन, आधुनिक सिलाई मशीन, होल बटण, काच बटण अशा अत्याधुनिक मशीन कामाचे प्रशिक्षण देल्या जात आहे. महापौर यांनी महिलांना कपड्याचे कटिंग काम करून कामात कुशल बनविण्यासाठी कार्य करण्याच्या सूचना दिल्या.




