– दोषी शिक्षक अनिल राऊतवर कठोर कारवाईची मागणी; पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी NSUI चे निवेदन
प्रतिनिधी / हंसराज, भंडारा पवनी :- पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, संबंधित दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भंडारा जिल्हा एनएसयुआयने (NSUI) आज पवनी पोलीस स्टेशनवर धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, वडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक अनिल राऊत यांनी एका लहान मुलीचा छळ केल्याचा आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भंडारा जिल्हा एनएसयुआयने कायदेशीर लढाई लढण्याचा पवित्रा घेतला आहे.
दि. ११ मार्च २०२६ रोजी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष रोहित खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लेखी निवेदन देऊन संबंधित शिक्षकावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
“पीडित मुलीला न्याय मिळवून देणार” – रोहित खोब्रागडे
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना रोहित खोब्रागडे म्हणाले की, “शिक्षक हा समाजाचा आरसा असतो, मात्र अनिल राऊत यांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर अन्याय करून या पवित्र पेशाला काळिमा फासला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पीडित मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”
पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.



