कामठी :- शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर कामठी शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने कांग्रेस सेवादल कामठी शहर अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात पोलिस प्रशासनाकडे सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी केली आहे. हल्दीराम हॉटेल समोरील यशोधरा पोलिस चौकी कायम सूरु ठेवून तिथे किमान १० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी ठोस मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सेवादलाचे ब्लॉक अध्यक्ष डॉ. सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त, नागपूर यांना पोलीस निरीक्षक महेश आंधळे मार्फत हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, होळीच्या दिवशी घडलेल्या गंभीर घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. याशिवाय, अंडरग्राउंड बोगद्याजवळील परिसरात अंधाराचे प्रमाण अधिक असल्याने चोरी, लूटमार व महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मागील काही दिवसांत मंगळसूत्र चोरीचेही प्रकार उघडकीस आले आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित भागात कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारून रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेस सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
निवेदन देताना राजकुमार गेडाम,प्रणाली बन्सोड, विपीन गायकवाड, पंकज खोब्रागडे,अर्चना ढोके, इंद्रजित गणवीर,अजाबराव उईके,रविकुमार चंद्रिकापुरे,राजहंस बांगर,वैशाली पाटील आदी उपस्थित होते.








