हंसराज, भंडारा प्रतिनिधी साकोली :- उमरझरी-बाम्पेवाडा वनक्षेत्रात वाघाची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. मंगळवारी सकाळी शेतालगतच्या झुडपी भागात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीवर वाघाने झडप घालून त्यांना ठार केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वसंत गणपत मेश्राम (वय ५० वर्षे, रा. बाम्पेवाडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम सुरू असल्याने वसंत मेश्राम हे नेहमीप्रमाणे आज, १९ मार्च रोजी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास गावाशेजारील शेतालगत असलेल्या झुडपी भागात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, वसंत मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटना घडलेले ठिकाण हे वन विकास महामंडळाच्या (FDCM) जंगल क्षेत्रात येते. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे बाम्पेवाडा आणि लगतच्या गावांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मोहफुले वेचण्यासाठी जंगलात किंवा शेताकडे जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने संबंधित हिंस्त्र पशूचा बंदोबस्त करावा आणि मृतकाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.








