spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बाजारातील मागणीनुसार पीक विविधीकरणाचे मॉडेल विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

– कृषी महाविद्यालय व कृषी विभागाचा आढावा

गडचिरोली :- हमीभाव खरेदीच्या जोडीने बाजारातील मागणी आणि स्थानिक कृषी परिस्थितीनुसार पर्यायी पिकांच्या संधी विकसित कराव्यात. उत्पादन खर्च व विक्रीच्या संधी विचारात घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याची क्षमता असलेल्या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात पीक विविधीकरणाचे मॉडेल विकसित करावे, अशा सूचना सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या.

स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आयोजित कृषी महाविद्यालय व जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते.

धान पिकाच्या जोडीने मका, नाचणी, काजू, फळबागा, भाजीपाला आणि मसाला पिकांच्या उत्पादनाच्या संधी तपासाव्यात. आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य पिकांकडे विविधीकरण करण्यासाठी ‘लायबिलिटी टू ॲसेट क्रॉप कन्व्हर्जन’ मॉडेल विकसित करावे. तसेच निर्यातक्षम शेतीमालासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठेशी जोडणी मजबूत करावी, असे त्यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला कृषी महाविद्यालयाच्या सह-अधिष्ठाता डॉ. माया राऊत यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम, प्रक्षेत्र उपक्रम, प्रयोगशाळा आणि पायाभूत सुविधांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. महाविद्यालयातील रिक्त पदे आणि पायाभूत सुविधांच्या आवश्यकतेबाबत ॲड. जयस्वाल यांनी मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कृषी विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा सादर केला. यामध्ये सेंद्रिय शेती, स्मार्ट (SMART) प्रकल्प, रब्बी हंगामाचे नियोजन आणि कृषी यांत्रिकीकरण योजनांची माहिती देण्यात आली.

बैठकीस कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विषय विशेषज्ञ, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles